एसी लोकल उद्यापासून महागणार, दहा टक्के भाडेवाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ac-local-train

सामना प्रतिनिधी । मुंबई

पश्चिम रेल्वे मार्गावर धावणाऱया एसी लोकलच्या तिकीट दरात 1 जूनपासून वाढ होणार आहे. आतापर्यंत उद्घाटन सवलत म्हणून लोकलच्या प्रथम वर्ग तिकीट दराच्या 1.2 पट भाडे आकारले जात होते. आता प्रथम वर्गाच्या 1.3 पट म्हणजे साधारण दहा टक्के भाडेवाढ होणार आहे.

गेल्या वर्षी 25 डिसेंबर 2018 पासून देशातील पहिली एसी लोकल पश्चिम रेल्वे मार्गावर सुरू झाली. सध्या चर्चगेट ते विरारदरम्यान एसी लोकलच्या 12 फेऱया चालविण्यात येतात. पहिलीच उपनगरीय वातानुकूलित सेवा असल्याने भाडय़ामध्ये सुरुवातीला सवलत देण्यात आली होती.

अशी भाडेवाढ होणार
एसी लोकलच्या नव्या 1.3 पट भाडेरचनेनुसार चर्चगेट ते विरार एकेरी प्रवासासाठी आता 202 रुपयांऐवजी साधारण 220 रुपये मोजावे लागणार आहेत, तर याच अंतराच्या मासिक पासासाठी 2040 रुपयांऐवजी 2205 रुपये मोजावे लागणार आहेत. तर चर्चगेट ते बोरिवली एकेरी प्रवासासाठी 165 रुपयांऐवजी 180 रुपये मोजावे लागणार आहेत. याच अंतराच्या मासिक पासासाठी 1640 रुपयांऐवजी 1775 रुपये मोजावे लागणार आहेत.