
मध्य रेल्वेने मुख्य मार्गावर येत्या 14 मेपासून वातानुकूलित लोकलच्या 44 वरून 56 फेर्या वाढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता पश्चिम रेल्वेही आपल्या वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या वाढविण्याच्या विचारात आहे. पश्चिम रेल्वेवर सध्या विरार ते चर्चगेट अशा एसी लोकलच्या 20 फेऱ्या होत असतात. त्यात आता आणखी 12 नव्या फेऱयांची भर पडणार असल्याने प्रवाशांचा प्रवास ‘थंडा थंडा कूल कूल’ होणार आहे.
रेल्वे बोर्डाने एसी लोकलच्या तिकीटदरात निम्म्याने कपात केल्याने मध्य रेल्वेने मुख्य मार्गावरील एसी लोकलच्या फेऱयांमध्ये 14 मेपासून वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर आता पश्चिम रेल्वेही आपल्या एसी लोकलच्या फेऱ्या वाढविण्याच्या तयारीत आहे. पश्चिम रेल्वेवरही लागलीच 12 नवीन एसी फेऱयांची भर पडणार आहे. त्यानंतर पुढच्या टप्प्यात आणखी 16 एसी फेऱ्या चालविण्याची योजना पश्चिम रेल्वेच्या मुंबई डिव्हिजनने आखली आहे. अशा आधीच्या 20 आणि नंतरच्या 28 फेऱया अशा एकूण 48 नवीन एसी फेऱया पश्चिम रेल्वेवर नव्या वेळापत्रकात दिसणार आहेत.
अशा वाढणार एसी लोकलच्या फेऱ्या
पश्चिम रेल्वेकडे सध्या तीन एसी लोकल वापरात असून एक एसी लोकल देखभाल-दुरुस्तीसाठी कारखान्यात आहे. तसेच पश्चिम रेल्वेला आखणी एक एसी लोकल रेल्वे बोर्डाकडून मिळणार आहे. त्यामुळे नव्या फेऱयांची आखणी करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेच्या एसी लोकलची आधी दिवसाला दीड ते तीन हजार तिकिटे विकली जायची. आता पाच हजारपेक्षा जास्त तिकिटांची विक्री होत आहे. त्यामुळे तातडीने 12 फेऱया वाढविण्यात येणार असून त्यात सहा डाऊन तर सहा अप फेऱयांचा समावेश असेल. त्यात चर्चगेट ते विरारदरम्यान पाच एसी लोकल फेऱया, अंधेरी ते विरार एक फेरी आणि विरार ते चर्चगेट पाच फेऱया तसेच भाईंदर ते चर्चगेट एक फेरी होणार आहे. प्रथम 12 फेऱया चालवल्या जातील आणि त्यानंतर नव्या वेळापत्रकात आणखी फेऱया चालवण्यासंदर्भात निर्णय होईल.


























































