अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने चिरडले; अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू

जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील चिंचखेडा पाटीजवळ मंगळवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास दुचाकी व टिप्परच्या भीषण अपघातात दुचाकीस्वार पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. राजु शुकालाल पवार (40),तर शोभा राजु पवार (35, रा. दत्तपुर ता. सिंदखेडराजा) अशी मृतांची नावे आहेत.

मंगळवारी सकाळी पवार पती-पत्नी जाफराबादकडून माहोरा, भोकरदनमार्गे सिल्लोडकडे मोटार सायकलने जात असताना माहोराकडून येणाऱ्या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने त्यांच्या दुचकीला जोरदार धडक दिली. या अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी जाफराबाद पोलीस ठाण्यात मृतांच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून टिप्पर चालक तसेच मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना घडल्यानंतर टिप्पर चालक पसार झाला.

शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह जाफराबाद ग्रामीण रूग्णालयात पाठवण्यात आले होते. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.या प्रकरणाचा तपास बिट जमादार सहाने करित आहेत. पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याने दत्तपुर गावावर शोककळा पसरली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या