जालन्यात लेकीचे लग्न लागत असताना वधूपित्यावर काळाचा घाला; वाहनाच्या धडकेत मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील विरेगाव येथे एकीकडे मंडपात लेकीचे लग्न लागत असताना दुसरीकडे मुख्य रस्त्यावर वधूपित्याला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात वधूपित्याचा जागीच मत्यू झाला आहे. राजू शेषराव खंडागळे (वय 48) असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे. या घटनेमुळे खंडागळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

भोकरदन तालुक्यातील विरेगाव येथील राजू शेषराव खंडागळे (वय 48) यांच्या धाकट्या मुलीचा लग्न समारंभ मंगळवारी सुरू होता. त्यावेळी वधूपिता राजू खंडागळे काही कामासाठी मुख्य रस्त्यावर आले असता भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. या धडकेने राजू यांच्या डोक्याला जबर फटका बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला. नातेवाईकांनी त्यांना भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर त्यांच्यावर विरेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, दोन मुले, तीन मुली असा परिवार आहे.