
नगर-पुणे महामार्गावर दोन मालवाहू ट्रक व दुचाकीच्या झालेल्या भिषण अपघातात चारजणांचा मृत्यू झाला आहे. अपघातात वडील आणि मुलासह चार जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघात एवढा भिषण होता की दुचाकीसह त्यावरील दोघेजण दोन ट्रकमध्ये दबले गेले होते. सोमवारी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
मालट्रक चालक शुभम राजू देशभ्रतार (वय 24,रा.दुधाडा,ता.कटोल, नागपूर),सहायक राहुल मधुकर डोंगरे (वय 31,रा.सावली, ता.कारंजा, जि.वर्धा) या दोघांसह दुचाकीवरील राजाभाऊ विष्णू चव्हाण (वय 50,रा.जातेगाव, ता.गेवराई,बीड) व त्यांचा मुलगा पुरूषोत्तम (वय 18) अशी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत.
जे. के. ट्रान्सपोर्ट व के.टी. ट्रान्सपोर्ट कंपनीच्या दोन मालट्रक एकामागोमाग एक पुण्याहून नगरच्या दिशेने निघाल्या होत्या. प्लॅस्टिक उत्पादनाचा कच्चा माल घेऊन निघालेल्या के.टी. कंपनीच्या मालट्रकचा मागचा टायर फुटल्याने या ट्रकच्या चालकाने अचानक गाडी थांबवली. या ट्रकच्या पाठीमागे दुचाकी येत होती. तर दुचाकीच्या मागे लोखंडी पाईप भरलेला ट्रक भरधाव वेगात येत होता. पुढचा ट्रक थांबल्याने मागील ट्रकच्या चालकाने जोरात ब्रेक दाबला. त्या धक्क्याने ट्रकमधील लोखंडी पाईप ट्रक चालकाच्या केबीनमध्ये शिरले. त्यामुळे चालक आणि त्याच्या सहकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. हा ट्रक भरधाव असल्याने दुचाकीला चिरडत पुढील ट्रकवर धडकला. त्यामुळे दुचाकीवरील दोघे दोन ट्रकमध्ये दबले होते. त्यामुळे त्यांचाही जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच सुपे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन गोकावे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त मालट्रक रस्त्याच्या बाजूला हटवण्यात आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. के.टी.कंपनीच्या ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
























































