
सामना ऑनलाईन । सातारा
पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर गॅस सिलींडर वाहून नेणाऱ्या ट्रकला दुचाकीने पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला. तर एकजण जखमी झाला. मृत आणि जखमी दोघेही कोरेगाव तालुक्यातील आसरे येथील आहेत. रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून जखमी युवकावर सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याबाबत जिल्हा रुग्णालयातून मिळालेली माहिती अशी की, योगेश दत्तात्रय सणस (वय २४) आणि त्याचा मित्र गणेश बबन सपकाळ (वय ३0, दोघेही रा. आसरे, ता. कोरेगाव, जि. सातारा) रविवारी दुपारच्या सुमारास दुचाकीने महामार्गावरुन साताराच्या दिशेने येत होते. योगेश दुचाकी चालवत होता. नागेवाडी ते लिंब नजीक महामार्गावरुन साताराकडे येत असताना त्यांच्या पुढे गॅस सिलींडर असलेला ट्रक होता. या ट्रकला दुचाकीने धडक दिली. त्यात दुचाकीचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर योगेश आणि गणेश या दोघांनाही तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, योगेशचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, गणेशची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.




























































