जालन्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, ट्रक चालक जागीच ठार, एकजण जखमी

समृद्धी महामार्गावरील नागपूर कॉरिडॉर चॅनल क्रमांक 386 /400 वर बुधवारी 15 मे रोजी पहाटे 03.30 वाजता जालन्यातील बदनापूर जवळील सोमठाणा शिवारात खताच्या गोण्याने भरलेला ट्रक मुंबईकडून नागपूरकडे जात असतांना,
टायर फुटले. त्याचदरम्यान, पाठीमागून भरधाव येणारा कांद्याच्या पोत्याने भरलेल्या ट्रकने पाठीमागून जोराची धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला आहे. त्यामध्ये पाठीमागील ट्रकचा चालक श्रीकांता लाल सरदार ( रा. माढा, बोधी रैना, जि. बुरुड वाण, पश्चिम बंगाल) हा जागीच ठार झाला. तसेच, त्याच्यासोबतचा क्लीनर चंदू सरदार (30) हा गंभीर जखमी झाला आहे.

या अपघाताची माहिती मिळताच रात्रगस्तीवर असलेले महामार्ग पोलीस केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक रामदास निकम यांच्यासह पोहेकाँ. बिऱ्हाडे, ज्ञानेश्वर माऊली खराडे आणि महामार्ग सुरक्षा पथकाच्या दोन कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळ गाठून मदत कार्य केले. मयत व जखमी या दोघांना तात्काळ समृद्धीच्या ॲम्बुलन्समधून पुढील उपचारासाठी सामान्य रुग्णालय जालना येथे हलविण्यात आले आहे. घटनास्थळी दोन्ही अपघातग्रस्त ट्रक आणि त्यातून खाली पडलेल्या खताच्या गोण्या आणि कांद्याच्या पोत्यांना एका बाजूला करून, महामार्ग पोलिसांनी वाहतूक धीम्या गतीने सुरळीतपणे सुरू केली आहे.