The Coconut Story! केरळ नव्हे तर, महाराष्ट्राच्या शेजारचं राज्य नारळ उत्पादनात अव्वल, तामिळनाडू दुसऱ्या स्थानावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केरळ (आता केरळम) हे एके काळी देशात सर्वाधिक नारळ उत्पादन करणारे राज्य म्हणून ओळखले जात होते. या राज्याला ‘नारळाची राजधानी’ म्हणूनही ओळखले जाते. असे म्हटले जाते की केरळमधील ‘केरा’ या शब्दाचा अर्थ नारळाचे झाड आणि ‘आलम’ या शब्दाचा अर्थ जमीन असा होतो. त्यामुळे हे राज्य ‘नारळाचे केंद्र’ म्हणून ओळखले जात होते. परंतु अलीकडील आकडेवारीनुसार केरळने हा किताब गमावला आहे. सर्वाधिक नारळ उत्पादनाचा विक्रम आता या राज्याच्या नावावर नाही. नारळ विकास मंडळाची आकडेवारी याला दुजोरा देत आहे. या आकडेवारीनुसार केरळ नव्हे तर, कर्नाटक देशातील सर्वाधिक नारळ उत्पादन करणारे राज्य ठरले आहे. 2020- 24 मध्ये कर्नाटकने 615 कोटी नारळांचे उत्पादन केले. विशेष म्हणजे, ‘नारळाचे केंद्र’ म्हणून ओळखले जाणारे केरळ तिसऱ्या स्थानावर आले आहे. 609 कोटी नारळांच्या उत्पादन आकडेवारानुसार तामिळनाडू दुसऱ्या स्थानावर आहे.

कर्नाटक नारळांचे उत्पादन करणारे अव्वल राज्य कसे बनले?

  • कर्नाटकात वीकेंड शेतीचा वाढता कल हे देखील नारळ उत्पादन वाढीचे एक कारण आहे. शहरातील व्यावसायिक भागातील विशेषतः तुमकूर, हसन आणि मंड्या जिल्ह्यांमध्ये तेथील लोक वीकेंडला नारळ आणि इतर पिकांची लागवड करतात. या सवयीमुळे कर्नाटकात नारळच्या उत्पादनात वाढ झाली आहे.
  • नारळाच्या झाडांना उत्तम उत्पादनासाठी उबदार आणि दमट हवामानाची आवश्यकता असते. कर्नाटकातील मंगळूर आणि उडुपीसारख्या किनारपट्टीच्या शहरांमध्ये पुरेसा ओलावा आणि पाऊस पडतो. यामुळे नारळ लागवडीसाठी ही परिस्थिती आदर्श ठरते.
  • कर्नाटमधील लाल चिकणमाती आणि किनारपट्टीच्या जमिनीत पाण्याचा निचरा चांगला होतो. ज्यामुळे त्या नारळ उत्पादनासाठी वरदान ठरतात. कर्नाटकात लाखो हेक्टर क्षेत्रावर नारळाची लागवड केली जाते. कर्नाटकातील शेतकरी विशेषतः दक्षिणेकडील जिल्ह्यांमधील मोठ्या प्रमाणात नारळ लागवडीवर अवलंबून आहेत.

हिंदुस्थान हे नारळ उत्पादनाचे केंद्र असल्याने अनेक देशांना नारळाचा पुरवठा केला जातो. व्हिएतनाम हा जगातील हिंदुस्थानी नारळांचा सर्वात मोठा खरेदीदार असून त्याखालोखाल संयुक्त अरब अमिराती आणि बांगलादेश आहे. त्याचबरोबर अमेरिका, मलेशिया, जर्मनी, नेदरलँड्स आणि मध्य पूर्वेकडून हिंदुस्थानी नारळांना मागणी आहे. जगाच्या एकूण नारळ उत्पादनापैकी 30 टक्क्यांहून अधिक उत्पादन एकट्या हिंदुस्थानात होते. हिंदुस्थानात दरवर्षी 21.37 अब्ज नारळांचे उत्पादन होते आणि देशात एक कोटीहून अधिक शेतकरी नारळाची लागवड करतात.