
सामना प्रतिनिधी । कोपरगाव
एका गुन्ह्यात रिमांड मधील असलेल्या आरोपीला तपासासाठी पोलिस स्टेशनला आणले असता शौचाचे कारण सांगून शौचालयात जाऊन ब्लेडने स्वतःच्या गळ्यावर वार केले. सर्वांना कामाला लावतो असे सांगून सदर आरोपीने पोलिसांना धमकावले. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये आरोपी चांगदेव भारम भोसले (३६) राहणार पढेगाव कोपरगाव या गुन्ह्याचा तपास कामी मंगळवारी रोजी दुपारी १२.४५ वाजता कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला आणले. तेव्हा शौचाचा बहाणा करून शौचालयात जाऊन स्वतःच्या गळ्यावर ब्लेडने वार करून घेऊन फिर्यादी व साक्षीदार यांना आता तुम्हाला सर्वांना कामाला लावतो, अशी धमकी देऊन फिर्यादी व साक्षीदार यांचेशी झटपट केली. तसेच त्याच्या हातातील ब्लेडने त्यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न करून फिर्यादी यांचे सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी सदर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





























































