
बॉलीवूडमधील अमिताभ बच्चन, आमीर खान, रणवीर सिंह यासारख्या बड्या अभिनेत्यांसोबत काम करणारा अभिनेता चक्क खुनी निघाला. हेमंत नागिनदास पुरुषोत्तमदास मोदी असे या आरोपीचे नाव असून तो गुजरातचा रहिवासी आहे. एका हत्येत दोषी आढळलेला हेमंत हा पॅरोलवर बाहेर आल्यानंतर तो बनावट नाव धारण करून चित्रपटसृष्टीत सक्रिय झाला होता. परंतु तब्बल 12 वर्षांनंतर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळत त्याला पुन्हा एकदा जेलमध्ये पाठवले आहे.
चित्रपटसृष्टीत हेमंत हा स्पंदन मोदी या नावाने ओळखला जात होता. 2008 साली एका हत्येप्रकरणी हेमंत, त्याचा भाऊ सचिन मोदी आणि इतर पाच आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. दोषी ठरल्यानंतर हेमंत मोदीला साबरमती मध्यवर्ती कारागृहात आणि त्यानंतर मेहसाणा कारागृहात पाठवण्यात आले. त्या ठिकाणी तो कैदी क्रमांक 31146 म्हणून ओळखला जात होता. जवळपास सहा वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर 25 जुलै 2024 रोजी गुजरात उच्च न्यायालयाने हेमंतला 30 दिवसाचा पॅरोल मंजूर केला होता.
पॅरोलवर सुटल्यानंतर हेमंत फरार झाला. तो नंतर तुरुंगात परतलाच नाही. एक वर्षे तो पाटण जिह्यात लपून राहिला. नंतर त्याने ट्विंकल मुकुंद दवे असे नाव बदलून अहमदाबाद गाठले. त्या ठिकाणी एका खासगी कंपनीत नोकरी केली. त्यानंतर तो अभिनयाकडे वळला.
हिंदी, गुजराती अन् मल्याळम चित्रपटात काम
हेमंतने सुरुवातीला नाटकात काम केले. त्यानंतर मुंबई गाठली. मुंबईत छोट्या-मोठ्या भूमिका केल्या. स्पंदन मोदी या नावाने त्याने हिंदी, गुजराती आणि मल्याळम चित्रपटात काम केले. तसेच त्याने ‘ठग्स ऑफ हिंदुस्थान’ या चित्रपटात अमिताभ आणि आमीर खानसोबत काम केले. रणवीर सिंग आणि बोमन इराणी यांच्यासोबत जयेशभाई जोरदार चित्रपटातही काम केले.


























































