दरोड्याच्या गुन्ह्यात आरोपीला दोन वर्षे सश्रम कारावास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तरुणाला दांडक्याने मारहाण करून त्याचा मोबाईल आणि रोकड चोरून नेणाऱ्याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी खडकी कोर्टाने दोन वर्षे सश्रम कारावास आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. एप्रिल 2017 मध्ये पुणे-मुंबई महामार्गालगत इंजिनिअरिंग चौकात ही घटना घडली होती.

प्रवीण अशोक देशमुख (24, रा. धर्मापूर, सोलापूर) असे शिक्षा ठोठाविल्याचे नाव आहे. याप्रकरणी शंकर भगवंता भागीत यांनी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

तक्रारदार शंकर भागीत 10 एप्रिल 2017 मध्ये मध्यरात्री एकच्या सुमारास दुचाकीवरून इंजिनिअरिंग चौकातून घरी चालले होते. त्यावेळी आरोपी प्रवीणने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांना थांबविले. त्यानंतर आरोपीने शंकरला दांडक्याने मारहाण करून मोबाईल आणि रोकड चोरून नेली होती.

खडकी पोलिसांनी प्रवीणला अटक केली. त्यानंतर तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक शिवाजी भोसले यांनी आरोपी प्रवीणविरुद्ध सबळ पुरावे न्यायालयात सादर केले होते. त्यानुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी धनश्री दरवेशी यांच्या कोर्टाने आरोपीला दोन वर्षे सश्रम कारावास आणि 10 हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

सरकारी पक्षाच्यावतीने सहायक सरकारी अभियोक्ता बकाल मॅडम यांनी कामकाज पाहिले. ही कामगिरी खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता चव्हाण, पोलीस निरीक्षक शफिल पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रताप गिरी, विजयसिंग गिरासे यांच्या पथकाने केली.