‘त्या’ बेजबाबदार डॉक्टरवर कारवाई करा – नासीर काझी; अन्यथा जनआंदोलन छेडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्मशानभूमीत मध्यरात्री जाऊन मयत व्यक्तीचा कोरोना स्वँब घेत, ती व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगून तालुक्यात घबराट निर्माण करणाऱया ग्रामीण रुग्णालयातील बेजबाबदार डॉ. सचिन बरगे यांच्याविरोधात प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी. अन्यथा जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भाजप तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन जिल्हा शल्यचिकित्सक यांना श्री. काझी यांनी दिले आहे.

कोळपे येथील महादेव सखाराम कांबळे 48 या व्यक्तीने 29 ऑगस्ट रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सदर व्यक्तीचे शवविच्छेदन करण्यासाठी वैभववडी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता त्याठिकाणी उपस्थित असलेले डॉ. सचिन बरगे यांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिला. त्यानंतर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश पाटील यांनी विनंती करूनही शवविच्छेदन करण्यात आले नाही. अखेर डॉ. उमेश पाटील हे स्वतः ग्रामीण रुग्णालयात पोहचले. व सदर व्यक्तीचे शवविच्छेदन केले. अंत्यसंस्कारासाठी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मृत व्यक्तीचे नातेवाईक मुंबई येथे असल्याने येईपर्यंत मृतदेह कोळपे येते घरी ठेवण्यात आला होता. दरम्यान डॉ. बरगे यांनी रात्री बारा वाजता आपल्याला फोन केला. मृतदेहावर अजून अंत्यसंस्कार का केले नाही. सदर व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असू शकते असे सुनावत हुज्जत घातल्याचे निवेदनात काझी यांनी म्हटले आहे.