
सामना प्रतिनिधी । राहुरी
राहुरी तालुक्यातील तसेच नगर मनमाड राज्य मार्गावरील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखा तसेच श्रीरामपूर व राहुरी पोलीस पथकाने आज बुधवारी सकाळी राहुरी शहरात मोटरसायकलची कागदपत्रे व लायसन्सची तपासणी मोहिम राबवत आवश्यक कागदपत्र न बाळगणाऱ्या २७ दुचाकी स्वारांवर दंडात्मक कारवाई करून हजारो रूपयांचा दंड वसूल केला.
राहुरी तालुक्यात चोऱ्या,रस्तालुट तसेच महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबाडून नेण्याच्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे आदेश जिल्हा पोलीस प्रमुख इशू सिंधू यांनी दिल्याने श्रीरामपुर विभागाचे पोलीस उपअधिक्षक राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी विशेष पोलीस पथकाकडून गुन्हेगारीला खतपाणी घालणाऱ्या विरूध्द कारवाईचा बडगा उगारण्यास आज बुधवारपासून प्रारंभ केला आहे.
श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधिक्षक राहुल मदने यांच्या आदेशाने राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हनुमंतराव गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश देशमुख यांनी श्रीरामपूर येथील वाहतूक शाखेतील देविदास राजगुरु, प्रकाश वाघमारे, सोमनाथ सायंबर, रवींद्र कोकणी, प्रसाद इंगळे, सचिन गायकवाड या वाहतूक पोलिसांनी आज राहुरी शहरातील स्टेशन रोड, पृथ्वी कॉर्नर, शुक्लेश्वर चौक या भागात दुपारपर्यंत कारवाई करून २७ दुचाकी चालकावर १०० ते २०० रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई केली.
या कारवाईमध्ये नंबर नसलेल्या दुचाकी, विना हेल्मेट, लायसन्स व कागदपत्रे नसलेल्या दुचाकी वाहनांचा समावेश होता. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दुचाकी सोडविण्यासाठी वाहन मालकांनी पोलीस ठाण्याच्या आवारात मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. दुचाकी वाहनांची कागदपत्रे पडताळणी केल्याशिवाय कुठलीही गाडी सोडणार नाही, अशी भूमिका पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी घेतल्याने फोन करून पुढारीपण मिरविणाऱ्या मंडळीचे प्रयत्न व्यर्थ ठरले. या कारवाई मोहिमेतून चोरीच्या मोटरसायकली देखील मिळून येतील, हा विश्वास दर्शवीत नागरीकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी केले.
मोटरसायकल वरील कारवाईच्या दरम्यान आपल्या कार्यकर्त्यांच्या मोटरसायकली सोडण्यासाठी तालुक्यातील अनेक पुढाऱ्यांनी फोन केले. मात्र कागदपत्र नसेल तर दंडात्मक कारवाई केली जाईल, ही ठोस भूमिका पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी घेतल्याने पुढाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली.


























































