नाले, उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर ‘वॉच’; 24 विभागांत 24 पथके तैनात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

नाल्यांमध्ये कचरा टाकणाऱ्यांचे पाणी कापण्याचा इशारा पालिकेने दिला असताना याच्या अंमलबजावणीसाठी पालिकेने 24 विभागांत 24 पथके तैनात केली आहेत. या गस्ती पथकात पोलिसांचाही समावेश असणार आहे. यामध्ये नाल्यांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकताना आढळल्यास ताबडतोब कारवाई केली जाणार आहे.

नाल्यांमध्ये प्लॅस्टिक, कचरा टाकल्यामुळे पावसाळ्यात मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचत असल्याचे समोर आल्यामुळे पालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कठोर निर्णय घेतला असून कचरा टाकताना आढळणाऱ्यांचे पाणी कापण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी पालिका प्रशासनाने सुरू केली असून गस्ती पथकांच्या माध्यमातून नाले, नाल्यांच्या लगतचा परिसर, रेल्के स्टेशन, गर्दीची ठिकाणे, रेल्वे ट्रकजवळचा परिसर, झोपडपट्टी परिसर अशा ठिकाणी कचरा करणारे आढळून आल्यास त्यांच्यावर ‘मुंबई पोलीस अधिनियम 1951’ नुसार तत्काळ कारवाई केली जाणार आहे. या कारवाईसाठी तयार केलेल्या पथकांमध्ये समावेश असणाऱ्या कर्मचाऱ्यांना याबाबतचे प्रशिक्षण परिमंडळनिहाय देण्यात येत असल्याची माहिती सह आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) अशोक खैरे यांनी दिली.

  • पालिकेच्या 24 प्रशासकीय विभागांच्या स्तरावर तयार करण्यात आलेल्या गस्ती पथकांमध्ये घनकचरा व्यवस्थापन खात्यातील कनिष्ठ अवेक्षक, मुकादम, अनुज्ञापन निरीक्षक, अतिक्रमण निरीक्षक, सहाय्यक अभियंता परिरक्षण यांचे प्रतिनिधी, वसाहत अधिकारी, दुकाने व आस्थापना निरीक्षक, स्वच्छता निरीक्षकांचा समावेश आहे.
  • नाल्यांमध्ये कचरा टाकणाऱ्या व्यक्ती, सार्वजनिक ठिकाणी कचरा करणाऱ्या व्यक्तींवर ‘मुंबई पोलीस अधिनियम 1951’अंतर्गत कलम 115 व 116 नुसार तत्काळ कारवाई केली जाणार आहे.
  • पोलीस वसाहतींमध्ये कचरा विलगीकरण व कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्याची कार्यवाही होत असल्याची खातरजमा मुंबई पोलिसांच्या स्तरावर केली जाणार आहे.

पालिका-पोलीस समन्वयातून कारवाई

स्वच्छतेसाठी घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी मुंबई पोलिसांबरोबर समन्वय साधून काम करण्याचे आदेश प्रवीण परदेशी यांनी  संबंधित अधिकाऱ्यांनी दिले आहेत. याकरिता घनकचरा व्यवस्थापन खात्यातील विशेष कार्याधिकारी सुभाष दळवी यांच्यावर समन्वयाची जबाबदारी सोपवण्यात आली असून मुंबई पोलिसांच्या वतीने ‘समन्वय अधिकारी’ म्हणून मुंबई पोलीस दलाचे उपायुक्त (ऑपरेशन) यांची नेमणूक करण्यात आली आहे.