फोन स्वीच ऑफ… घराला कुलूप, बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार

बलात्काराचा गुन्हा दाखल होताच अभिनेता एजाज खान फरार झाला आहे. चारकोप पोलिसांनी एजाज खानशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा फोनही स्विच ऑफ येत आहे. एजाजच्या शोधात पोलीस त्याच्या घरी पोहोचले, पण तो घरीही सापडला नाही. त्याच्या घराला कुलूप होते.

लग्नाचे आमिष दाखवून आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप करत एका 30 वर्षीय अभिनेत्रीने ‘हाऊस अरेस्ट’चा सूत्रसंचालक आणि अभिनेता एजाज खान याच्याविरुद्ध चारकोप पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. एजाज खानने आपल्याला ‘हाऊस अरेस्ट’ शो होस्ट करण्याची ऑफर दिली होती. शूटिंगदरम्यान एजाजने लग्नासाठी प्रपोज केले आणि घरी नेऊन 25 मार्च रोजी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले, असा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे. एवढेच नाही तर, एजाज खानने महिलेला धर्म बदलून तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासनही दिले होते.

अडचणीत वाढ

बलात्कारासोबतच एजाज खानवर समाजात अश्लीलता पसरवल्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. ‘हाऊस अरेस्ट’ या शोदरम्यान एजाजने महिला स्पर्धकांना अश्लील कृत्ये करण्यास सांगितले होते, ज्याचे व्हिडीओ व्हायरल झाले. त्यानंतर एजाज खान आणि उल्लू अॅपवर कारवाईची मागणी केली जात आहे. या वादादरम्यान उल्लू अॅपने ‘हाऊस अरेस्ट’ या शोचे सर्व भाग काढून टाकले आहेत.