यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार नाही!

अभिनेता चिन्मय मांडलेकर याने यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका न साकारण्याचा निर्णय घेतला आहे. मुलाच्या नावावरून चिन्मय आणि त्याच्या कुटुंबीयांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. कुटुंबाला मानसिक त्रास नको म्हणून चिन्मयने हा निर्णय घेतला आहे.

‘तू चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारतोस आणि मुलाचे नाव जहांगीर का?’ असे  म्हणत अनेकांनी चिन्मयला अश्लाघ्य भाषेत ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. चिन्मयने आज व्हिडीओ शेअर करून आपल्या भावना व्यक्त केल्या. चिन्मय म्हणाला, ट्रोलिंग माझ्या कामामुळे नाही, तर माझ्या  मुलाच्या नावावरून होत आहे. मी साकारत असलेल्या भूमिका तुम्हाला आवडल्या किंवा नाही आवडल्या, तर तुम्ही जे म्हणाल ते मी ऐकून घेईन. मात्र आता माझ्या मुलाच्या नावावरून त्याच्या चारित्र्यावर, त्याच्या पालकांवर आणि माझ्या पत्नीच्या चरित्र्यावरदेखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

माणूस म्हणून या गोष्टीचे खूप वाईट वाटते

चिन्मय पुढे म्हणाला की, एक माणूस म्हणून मला या गोष्टीचे खूप वाईट वाटतेय. आजवर मी अनेक भूमिका केल्या. मात्र माझ्या भूमिकांमुळे माझ्या कुटुंबाला त्रास होणार असेल तर तो मला कदापि मान्य नाही आणि म्हणूनच मी यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मी आजपर्यंत सहा चित्रपटांत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली, पण आता नाही. छत्रपती शिवरायांची क्षमा मागून या भूमिकेची रजा घेतो, असे चिन्मयने स्पष्ट केले. चिन्मयच्या या निर्णयाने प्रेक्षकांना धक्का दिला आहे. नुकतेच चिन्मयची पत्नी नेहा जोशी-मांडलेकर हिनेदेखील व्हिडीओद्वारे भावना व्यक्त केल्या होत्या.