
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना बुधवारी सकाळी ब्रीच कॅण्डी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या कुटुंबाने यापुढे घरीच उपचार सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. धर्मेंद्र यांच्या जुहू येथील घरीच आयसीयू बेडची व्यवस्था करण्यात आली असून त्यांच्या देखभालीसाठी डॉक्टरांनी टीम तैनात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
श्वास घेण्यास त्रास होत असल्याने धर्मेंद्र यांना ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मंगळवारी सकाळी त्यांच्या निधनाच्या अफवा पसरल्यामुळे चाहते काळजीत होते. त्यांच्या घराबाहेर मोठी गर्दी जमली होती. पण आता धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. प्रतीक समदानी म्हणाले, ‘धर्मेंद्र यांना आज सकाळी 7ः30 च्या सुमारास रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
अफवांवर विश्वास ठेवू नका…
सनी देओलच्या टीमने जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय, ‘धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे आणि ते घरीच उपचार घेतील. आम्ही माध्यमांना आणि चाहत्यांना विनंती करतो की, त्यांनी या काळात कोणत्याही प्रकारच्या अफवांपासून दूर राहावं आणि त्यांचा कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करावा…’
‘वीरू’ला भेटण्यासाठी ‘जय’ पोहोचला…
बॉलीवूडमधील सर्वात आयकॉनिक जोडींपैकी एक म्हणजे अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांनी ‘शोले’ चित्रपटात साकारलेली ‘जय- वीरू’ची जोडी. डिस्चार्ज दिल्याचे समजताच अमिताभ बच्चन यांनी धर्मेंद्र यांच्या जुहू येथील बंगल्यावर जाऊन प्रकृतीची विचारपूस केली.


























































