
अभिनयाकडून राजकारणाकडे वळलेले मक्कल निधी मय्यम पार्टीचे नेते, सुपरस्टार कमल हासन यांनी चित्रपटातून संन्यास घेणार असल्याचे संकेत दिले आहेत. जर माझ्या राजकीय कारकीर्दीत चित्रपट अडथळा बनत असेल तर मी चित्रपटाला रामराम ठोकण्यास तयार आहे, असे त्यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
राजकारण हे समाजसेवेचे माध्यम आहे. माझे राजकीय क्षेत्रात येणे ऐतिहासिक आहे. कारण मी राजकारणापासून दूर राहिलेल्या 30 टक्के लोकांपैकी एक आहे. दिवंगत मुख्यमंत्री एम. जी. रामचंद्रन यांनी अनेक चित्रपटांत आमदार म्हणून भूमिका केली होती. त्यांनी या माध्यमातून आपल्या तत्त्वांचा प्रचार केला आणि जनसेवेसंबंधी आपले उद्दिष्ट पूर्ण केले होते, असे कमल हासन यांनी यावेळी नमूद केले. माझ्या सध्याच्या सर्व असाइनमेंट्स पूर्ण करून मी चित्रपटाला रामराम ठोकण्यास तयार आहे, असे ते म्हणाले.
बघू कोण गायब होतेय!
तामीळनाडू विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या विरोधी उमेदवारांना कमल हासन यांनी आव्हान दिले आहे. निवडणूक रिंगणात उतरलेले काही उमेदवार बोलताहेत की मी राजकारणातून बाहेर पडून पुन्हा चित्रपटाकडे वळेन. बघू, राजकारणातून कोण गायब होतेय ते, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.




























































