
पॉर्न व्हिडीओ रॅकेटप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा नवरा राज कुंद्रा व आणखी एक आरोपी उमेश कामत याला पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांच्या अटकेनंतर काही वृत्तवाहिन्यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता उमेश कामत याचा फोटो दाखवत बातम्या दिल्या. या प्रकरणाशी आपला काहीही संबंघ नसताना प्रसारमाध्यमांनी आपला फोटो वापरल्याने उमेश कामत भडकला असून त्याने या माध्यांमांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा दिला आहे.
Irresponsible journalism. @aajtak @CrimeTakBrand #Newsnation pic.twitter.com/wqoq25u9k5
— Umesh Kamat (@kamat_umesh) July 21, 2021
उमेश कामत हा मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. तर राज कुंद्रा प्रकरणातील मुख्य आरोपीचे नाव देखील उमेश कामत आहे. नावातील साधर्म्यामुळे काही प्रसारमाध्यमांनी अभिनेता उमेश कामतचा फोटो लावत बातम्या दिल्या आहेत. याबाबत उमेशने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत कारवाईचा इशारा दिला आहे.
“आज राज कुंद्रा प्रकरणात चालवण्यात आलेल्या बातमीमध्ये या प्रकरणातील एक आरोपी उमेश कामत याचा फोटो म्हणून माझा फोटो लावला जातो आहे. कुठलीही शहानिशा न करता वृत्तवाहिन्यांनी या प्रकरणात माझा फोटो लावून माझी बदनामी केली आहे. या प्रकारामुळे होणाऱ्या माझ्या वैयक्तिक, व्यावसायिक आणि सामाजिक हानीसाठी या वृत्तमाध्यमांना जबाबदार धरले जाईल. या प्रकरणी संबंधित मी योग्य ती कायदेशीर कारवाई निश्चितच करेन” असा इशारा अभिनेता उमेश कामतने सोशल मीडियावरुन दिला आहे.


























































