आपले नेते अशिक्षित! काजोलच्या विधानाने वादळ; सोशल मीडियात झाली ट्रोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दमदार अभिनय आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाणारी बॉलीवूड अभिनेत्री काजोलने ‘देशांतील नेते अशिक्षित’ असल्याचे वक्तव्य केले आहे. यावरून काजोल सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहे. त्यानंतर तिने आज ट्विट करून आपली बाजू मांडली.

लवकरच काजोलची ‘द ट्रायल’ ही वेबसीरिज येत आहे. काजोल सध्या वेबसीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रमोशनदरम्यान एका मीडिया पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत तिने देशातील नेत्यांवर टीका केली. काजोल म्हणाली, ‘आपल्या देशात बदल हा धीम्या गतीने होतोय. कारण आपण आपल्या परंपरा आणि विचारांमध्ये मग्न आहोत आणि अर्थातच त्याचा संबंध शिक्षणाशीही आहे. तुमच्याकडे असे राजकीय नेते आहेत ज्यांची कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नाही. मला याचा खेद आहे, पण मी बाहेर जाऊन हे सांगणार आहे.

काजोल पुढे म्हणाली, देशावर राजकारण्यांची सत्ता आहे. यापैकी अनेक नेत्यांजवळ तर दृष्टिकोनच नाही, मला वाटतं हा दृष्टिकोन तुमच्यात शिक्षणामुळे येतो. शिक्षणच तुम्हाला विविध कोनांतून पाहण्याची संधी देते. नेत्यांच्या शिक्षणावर काजोलचे हे वक्तव्य मोठय़ा प्रमाणात व्हायरल होत आहे. तिला ट्रोल केले गेले. अनेकांनी तिला तुझे शिक्षण किती म्हणून विचारणा केली आहे.

काजोलने केला खुलासा
ट्रोल झाल्यानंतर काजोलने तिच्या व्हायरल वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले. तिने ट्विट करत लिहिलं, ‘मी फक्त शिक्षण आणि त्याचे महत्त्व यावर बोलत होते. कोणत्याही राजकीय नेत्याला कमी लेखण्याचा माझा उद्देश नव्हता. आपल्याकडे असे काही महान नेते आहेत जे देशाला योग्य मार्गावर घेऊन जात आहेत.’