Karishma Sharma – मुंबईत धावत्या लोकलमधून बॉलिवूड अभिनेत्रीनं उडी घेतली; स्वत: सांगितलं नेमकं काय घडलं?

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा शर्मा हिने मुंबईत धावत्या लोकलमधून उडी घेतली आहे. यामुळे ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. धावत्या लोकलमधून उडी का घेतली आणि नेमके काय घडले याबाबत तिने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती दिली आहे.

करिश्मा शर्मा हिने ‘रागिणी एमएमएस – रिटर्न’ आणि ‘प्यार का पंचनामा’ या सारख्या चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. आता लोकलमधून उडी घेतल्याने ती चर्चेत आली आहे. आपण लोकलमधून उडी का घेतली याबाबत तिने स्वत: माहिती दिली आहे.

‘चर्चगेट भागामध्ये शूटिंग सुरू होते आणि शूटिंगसाठी उशीर होत असल्याने मी मित्रांसोबत लोकल ट्रेनने जाण्याचा निर्णय घेतला होता. मी साडी घातलेली होती. मी लोकल ट्रेनमध्ये चढले आणि ट्रेन वेगाने पुढे निघाली. मात्र काही कारणांनी माझे मित्र ही लोकल पकडू शकले नाहीत. याच भीतीने मी लोकल ट्रेनमधून उडी घेतली. दुर्दैवाने मी पाठीवर पडले आणि माझ्या डोक्यालाही दुखापत झाली’, अशी माहिती करिश्माने सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली.

‘माझ्या पाठीला दुखापत झाली असून डोके सूजले आहे. माझ्या शरीरावर जखमा झाल्या आहेत. डोक्याला झालेली दुखापत किती गंभीर आहे याचे निदान होण्यासाठी डॉक्टरांनी सध्या एमआयआर करण्याचा सल्ला दिला आहे. मला एक दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. मला वेदना होताहेत, पण मी कणखर आहे’, असेही करिश्माने पोस्टमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, करिश्मा शर्मा हिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. मी लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करा, असे आवाहन तिने चाहत्यांना केले आहे.