‘वॉक’ आवश्यक !

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेत्री निशा परुळेकर म्हणजे चित्रपट आणि मालिकांच्या माध्यमातून घरोघरी पोहोचलेला लोकप्रिय चेहरा.  निशा परुळेकर  कोणताही डाएट करत नाही. फक्त प्रत्येक गोष्ट एका मर्यादेत खायचे एवढा नियम मात्र ती पाळते, पण नियमितपणे चालणे हे सर्वात महत्त्वाचे आहे आणि त्याचे पालन ती करते.

जिम करायला निशाला फारसा वेळ मिळत नाही, पण मिळेल तितका वेळ ती वॉक करते. सेटवरही तिला जसा वेळ मिळेल तशी चालते. निशाच्या मते चालण्याने कॅलरीज बर्न होतात, अन्न लवकर पचते आणि मुख्य म्हणजे आपल्या सोयीनुसार वॉक करू शकतो. ती ‘महालक्ष्मी’ची भूमिका करत होती. तेव्हा कमीतकमी तीन किलोचे दागिने घालावे लागायचे. तरीही ते सर्व घालून चालायची. चालणे हा सर्वात सोपा  व्यायाम आहे. तुम्ही कधीही, कुठेही, कसेही चालू शकता आणि हा सर्वांना जमेल असा व्यायाम आहे आणि हेच निशाच्या फिट राहण्यामागचे कारण आहे.

निशाची आवडती डिश म्हणजे मासे. ऑल टाईम फेव्हरेट डिश….फक्त मासे. सी फूड तर तिला जास्तच आवडतं. आईच्या हातची पुरणपोळीही प्रिय. तिला जंक फूड अजिबात आवडत नाहीत. ज्या गोष्टी आपल्या शरीरासाठी अयोग्य आहेत त्या नकोच.

सकाळीच पोटभरून ब्रेकफास्ट करायचा. दुपारचे जेवण, मग संध्याकाळी आणि रात्री एकदम हलके खायचं. थोडी फळं खायची. अशा प्रकारचं तिचे रोजचे रुटीन असते. गोड पदार्थांमध्ये तिला उकडीचे मोदक, पुरणपोळी आणि गुलाबजाम आवडतात. तिखटाच्या तुलनेत गोड पदार्थ तितकेसे आवडत नाहीत.

बाहेरचे खाण्यापेक्षा निशा घरचे जेवण खायला जास्त प्राधान्य देते, पण एखाद्या वेळी बाहेर खाणे झालेच तर तिला अरेबियन फूड खायला आवडते.

खवय्यांना आणि चाहत्यांना निशा सांगते, एकच जन्म आहे आपल्या सर्वांकडे. सगळे खा, पण प्रमाणात खा. त्यामुळे मग आणखी गोष्टी ‘ट्राय’ करायला मिळतात. शरीर खूप महत्त्वाचे आहे, तर त्या शरीराला काही इजा होऊ नये याची काळजी घ्या. इतके खाऊ नका की, तुमचे वजन वाढेल किंवा हृदयविकाराचा त्रास होईल, कॉलेस्ट्रॉल वाढेल. सगळे आजार खाण्यामुळे होतात असे नाही, पण आपल्या शरीराची काळजी आपण व्यवस्थित केली पाहिजे.

भरपूर खा, भरपूर चाला. कारण हा अत्यंत सोपा आणि कुणीही करू शकेल असा व्यायाम आहे. त्यामुळे शरीराला चालना मिळते.  आणि मानसिक स्वास्थ्यही जपले जाते. शारीरिकपेक्षा मानसिक आजार जास्त हानिकारक असतो. त्यामुळे ताण घेऊ नका. तुम्हाला जे आवडते ते करा. कोणाच्या दबावाखाली येऊन कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नका. तरच तुम्ही तुमचे काम एन्जॉय करू शकता. लोकांसाठी चांगले काम करा, आयुष्यात नक्की सकारात्मकता येईल.

 – मृदा झरेकर, म. ल. डहाणूकर कॉलेज