
आडाळी येथील एमआयडीसी स्थानिक कृती समिती आणि ‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’ संचालित आडाळी एमआयडीसी स्थानिक लोकाधिकार संरक्षण समिती यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यानंतर आडाळी औद्योगिक क्षेत्रातील भूखंड आता उद्योजकांसाठी खुले झाले आहेत. एकूण 32.02 हेक्टर क्षेत्रातील 210 भूखंड पहिल्या टप्प्यात खुले झाले असून आमच्या दृष्टीने ही अत्यंत समाधानाची बाब आहे, अशी माहिती ‘घुंगुरकाठी’चे अध्यक्ष सतीश लळीत यांनी दिली आहे.
लळीत म्हणाले की, आडाळी औद्योगिक क्षेत्रातील भूखंड खुले व्हावेत, यासाठी आमच्याबरोबरच जिह्यातील विविध राजकीय नेते, समाजसेवक आणि संघटना यांनीही आपापल्या परीने प्रयत्न केले होते. या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांना आता यश आले आहे. आडाळी औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठय़ासाठी बंधारा, पाण्याची टाकी, पाईपलाईन आदी सर्व कामे अंतिम टप्प्यात आहेत.
या औद्योगिक क्षेत्रामध्ये आपले उद्योग सुरू करण्यासाठी अनेक उद्योजक उत्सुक आहेत. या क्षेत्रातील पायाभूत सुविधांची कामे लवकर पूर्ण करून भूखंड उद्योजकांना तात्काळ उपलब्ध करावेत, या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी आडाळीतील ग्रामस्थांनी आडाळी एमआयडीसी स्थानिक कृती समिती स्थापन केली होती. तसेच ‘घुंगुरकाठी’ संस्थेने आडाळी एमआयडीसी स्थानिक लोकाधिकार संरक्षण समिती स्थापन केली होती.


























































