
मुंबईतील अनेक महत्त्वाचे प्रोजेक्ट अदानीच्या घशात घातले असताना मरीन ड्राइव्ह येथे होणाऱ्या ‘मरीना प्रकल्पा’वरही अदानीचा डोळ असल्याचे समोर आले आहे. तब्बल 887 कोटी खर्च करून 12 हेक्टर जागेवर हा ‘मरीना प्रकल्प’ विकसित केला जाणार आहे.
मुंबईचा पर्यटन विकास करण्याच्या नावाखाली मरीन ड्राइव्ह येथे हा प्रोजेक्ट राबवण्यात येत आहे. या प्रकल्पाचे बांधकाम, संचालन आणि देखभालीसाठी मुंबई बंदर प्राधिकरणाने निविदा मागवल्या आहेत. याला पाच कंपन्यांकडून प्रतिसाद मिळाला असून यात अदानी समूहाच्या सेमइंडिया प्रोजेक्टस लिमिटेडचा समावेश आहे. या निविदांची छाननी करून त्यानंतर आर्थिक निविदा खुल्या करण्यात येतील. त्यानंतर निविदेत कोण बाजी मारेल हे स्पष्ट होईल. खासगी आणि सार्वजनिक सहभागातून हा प्रकल्प राबवण्यात येत आहे.
12 हेक्टरवरील या मरिना प्रकल्पात 30 मीटर लांबीपर्यंतच्या 424 लहान, मोठय़ा नौका (यॉटस्) उभ्या करता येणार आहेत. या प्रकल्पात मुख्य मरिना टर्मिनल इमारत बांधण्यात येणार असून नमो भारत इंटरनॅशनल सेलिंग स्कूल, सागरी पर्यटन विकास केंद्र, हॉटेल्स, क्लबहाऊस आणि नौका दुरुस्ती सुविधा असणार आहेत. तर बँक, एटीएम केंद्र, वाहनतळ, टॅक्सी वाहनतळ, सभागृह, हॉल, सुपर मार्पेट आदी सुविधाही येथे विकसित केल्या जाणार आहेत. तर बोटी उभ्या करण्यासाठी किनारपट्टीपासून 523 मीटर आत समुद्रात जागा असणार आहे.



























































