
मुंबईकरांसह देशभरातील वीज ग्राहकांना जास्तीत जास्त हरित ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी अदानी ग्रीन एनर्जीने ‘मिशन ग्रीन एनर्जी’ सुरू केले आहे. त्यानुसार तब्बल सहा हजार मेगावॅट वीज सौर ऊर्जा प्रकल्पातून घेण्यासाठी सोलर एनर्जी कॉर्पेरेशन ऑफ इंडियासोबत वीज खरेदी करार केले आहे. तसेच पुढील दोन महिन्यांत आणखी दोन हजार मेगावॅट सौर ऊर्जेच्या खरेदीसाठी करार करण्यात येणार आहेत.
अदानी इलेक्ट्रिसिटीने 2023 पर्यंत मुंबई उपनगरातील आपल्या वीज वितरणाच्या 30 टक्के वीज सौर ऊर्जा प्रकल्पातून खरेदी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तसेच भविष्यात सौर ऊर्जेला वाढणारी मागणी लक्षात घेत जास्तीत जास्त सौर ऊर्जा खरेदी करण्याचा सपाटा लावला आहे. त्याचाच भाग म्हणून अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने सौर ऊर्जा निर्मिती क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या सोलर एनर्जी कॉर्पोरेशनसोबत आधी 1330 मेगावॅट तर आज 4 हजार 667 मेगावॅट वीज खरेदी करण्याबाबत करार केल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
50 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार
‘आत्मनिर्भर’ कार्यक्रमांतर्गत नूतनशील ऊर्जा (ग्रीन एनर्जी) निर्मितीला चालना देणे, कार्बनचे उत्सर्जन कमी करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. त्या पार्श्वभूमीवर अदानी ग्रुप नूतनशील ऊर्जा क्षेत्रात 50 अब्ज डॉलर एवढी गुंतवणूक करण्यास कटिबद्ध असल्याचे ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी स्पष्ट केले आहे.




























































