
सामना प्रतिनिधी । नांदेड
“नांदेड परिक्षेत्रातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावे, यासाठी आपण येथे आलो आहोत” अशी प्रतिक्रिया राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संदीप बिष्णोई यांनी दिली.
“लोकप्रतिनिधी, नागरिक व सर्वसामान्य जनतेच्या सहभागाने यावर्षीचा गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी योग्य त्या सुविधा उपलब्ध करणे, मनुष्यबळ उपलब्ध करणे आणि कायदा व सुव्यवस्थेचे पालन करणे, यासाठी अधिकार्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत” असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना नमूद केले.
नांदेड परिक्षेत्रात कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेऊन गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी राज्य शासनाने आज संदीप बिष्णोई यांना नांदेडला पाठविले आहे. नांदेड परिक्षेत्रातील नांदेड, हिंगोली, परभणी आणि लातूर जिल्ह्यातील अधिकार्यांना त्यांनी आज संबोधित केले. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखताना सर्वसामान्य जनता, गणेशोत्सव समित्या, लोकप्रतिनिधी, नगरसेवक, शांतता समितीचे सदस्य यांच्या संपर्कात राहून बैठका घेणे व त्यांना याबाबत अवगत करणे महत्वाचे ठरणार आहे. शहरातील सीसीटीव्ही या काळात चालू ठेवून कुठेही अप्रिय घटना घडणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. पत्रकारांशी बोलतांना त्यांनी सांगितले की, “गणेशोत्सव हा पारंपारिक महोत्सव शांततेत पार पाडावा, यासाठी योग्य ती काळजी परिक्षेत्रात घेतली जावी”, अशा सूचना आपण केल्याचे त्यांनी सांगितले.
प्रामुख्याने शांतता समितीच्या बैठकांसोबतच त्या त्या भागातील लोकप्रतिनिधी, नगरसेवक, जि.प.सदस्य, पंचायत समिती सदस्य व सरपंच यांच्या संपर्कात राहून कायदा व सुव्यवस्था तसेच उत्सवातील सर्व कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. वेगवेगळ्या गणेशोत्सवाच्या ठिकाणी लावण्यात येणारे देखावे याबाबत देखील पोलिसांनी व संबंधित यंत्रणेने सतर्क राहून त्याबाबत काळजी घ्यावी व त्यामुळे कुठलीही अप्रिय घटना होणार नाही, याबाबत देखील सतर्क राहण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सर्व ती काळजी घेण्याच्या सूचना आपण अधिकार्यांना केल्या असल्याचे त्यांनी सांगितले. जनतेशी संपर्क व त्यांच्याशी सुसंवाद हा महत्वाचा असून, याबाबत प्रत्येक पोलीस स्टेशनच्या अधिकार्यांनी सतर्कता बाळगली तर हा महोत्सव शांततेत पार पडू शकेल, अशाही सूचना आपण केल्याचे त्यांनी सांगितले.




























































