बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला गती मिळू दे! आदित्य ठाकरे यांचे गणरायाला साकडे

405

चार वर्षे नारळ फुटून देखील वरळी-शिवडीतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा प्रश्न लटकलेलाच आहे. म्हणूनच शिवसेनेने म्हाडाकडे पाठपुरावा करून हा विषय मांडला. म्हाडामध्ये आम्ही जे विषय मांडले ते मुख्यमंत्र्यांकडे मंजुरीसाठी गेले असून लवकरच ते त्यावर निर्णय घेतील अशी आशा आहे. पोलिसांच्या घरांचे किंवा बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे रखडलेले प्रश्न लवकरच मार्गी लागू दे आणि येथील कामाला चालना मिळू दे असे साकडे शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विघ्नहर्त्या गणरायाला घातले.

वरळीमधील जनता कॉलनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, आदर्श नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, वरळी पोलीस वसाहत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अशा विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना बुधवारी आदित्य ठाकरे यांनी भेट देऊन बाप्पाचे आशीर्वाद घेतले. भेटीदरम्यान त्यांनी स्थानिकांच्या समस्यादेखील जाणून घेतल्या. ठिकठिकाणी मंडळांतर्फे आदित्य ठाकरे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

मुंबईतील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी आठ आमदारांच्या समितीने केलेल्या शिफारशी दोन ते तीन वर्षांपासून प्रलंबित होत्या. आम्ही हा विषय लावून धरल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये आणून तो मंजूर केला. त्यामुळे येथे लवकरात लवकर कामाला चालना मिळेल अशी मी बाप्पाकडे प्रार्थना करतो, असेही आदित्य ठाकरे पुढे म्हणाले. यावेळी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंत, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, माजी राज्यमंत्री सचिन अहिर, आमदार सुनील शिंदे, उपमहापौर हेमांगी वरळीकर, नगरसेविका किशोरी पेडणेकर, नगरसेवक अरिंवद भोसले, हरीश वरळीकर, युवासेना उपविभाग अधिकारी अभिजित पाटील यांच्यासह शिवसैनिक, युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या