
मुंबईत राँगसाइड ड्रायव्हिंगचे प्रमाण वाढले असून त्यामुळे अपघात होत आहेत. हे रोखण्यासाठी संबंधित वाहनचालकांवर ऑफलाइन पद्धतीनेही दंडात्मक कारवाई करण्याची परवानगी वाहतूक पोलिसांना देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज विधानसभेत केली.
आदित्य ठाकरे यांनी माहितीच्या मुद्दय़ाद्वारे या गंभीर प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. वरळी येथे झालेल्या अपघाताचा दाखलाही त्यांनी दिला. वाहनाच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला. मुंबईतील रस्त्यांवर उलटय़ा दिशेने वाहने चालवण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यात मोटारसायकली, टेम्पो, ट्रकही चुकीच्या दिशेने ड्रायव्हिंग करत असतात, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. अशा राँगसाइड ड्रायव्हिंगमुळे अपघात घडतात आणि अनेकदा त्यात प्राणहानी होते. अशा वाहनांना ऑनलाइन पद्धतीने दंड ठोठावला जात असल्याने वाहनचालकांवर जरब बसत नाही. किती दंड ठोठावला गेला हे त्यांना तातडीने कळत नसल्याने आपण किती गंभीर गुन्हा केलाय याची जाणीव त्यांना होत नाही. त्यामुळे अशा वाहनचालकांवर ऑफलाइन पद्धतीने दंडात्मक कारवाई केली पाहिजे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
बांधकामांच्या ठिकाणी पोलिसांचे धावते पथक
मुंबईत अनेक ठिकाणी बांधकामे सुरू आहेत. त्यासाठी बांधकामाच्या ठिकाणी बॅरिकेड्स उभारली जातात. बांधकाम करणारे त्यांच्या सोयीनुसार त्या बॅरिकेड्सची जागा बदलत असतात. त्यामुळे वाहनचालकांची अडचण होते. अशा बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी सिग्नल लावले आहेत का, बॅरिकेड्सवर रेडियम आहेत का याची पाहणी करण्यासाठी पोलिसांचे धावते पथक ठेवण्यात यावे, अशीही मागणी आदित्य ठाकरे यांनी केली.


























































