ही तर माणुसकीशी गद्दारी! आदित्य ठाकरे यांचा पाटण मतदारसंघातील सभेत गद्दारांवर तुफान हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शंभूराज देसाई यांच्या पाटण मतदारसंघात येऊन गद्दारांवर तुफान हल्ला चढविला. ‘ही गद्दारी केवळ शिवसेनेबरोबर झालेली नाही, ही गद्दारी केवळ उद्धवसाहेबांबरोबर झालेली नाही, तर ही माणुसकीसोबत झालेली गद्दारी आहे,’ असा घणाघात करीत, ‘अशा गद्दारीला आपण पाठबळ देणार का?’ असा जळजळीत सवाल आदित्य ठाकरे यांनी करताच उपस्थितांनी ‘नाही… नाही…’ असे म्हणून प्रतिसाद दिला.

आदित्य ठाकरे यांनी सुरू केलेल्या ‘निष्ठा यात्रे’ला महाराष्ट्रभर जबरदस्त प्रतिसाद मिळत असून, त्यामुळे विरोधकांना धडकी भरत आहे. आज ही ‘निष्ठा यात्रा’ पाटण मतदारसंघात पोहोचली, तेव्हा मिळालेल्या अलोट प्रतिसादाने सर्वत्र चैतन्य संचारले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी गद्दारांवर हल्लाबोल केला.

आदित्य ठाकरे म्हणाले, ‘ज्या शिवसेनेने यांना ओळख दिली, सत्ता आणि पदे दिली, त्याच शिवसेनेशी यांनी गद्दारी केली. शिवसेनेने यांना काय कमी दिले होते? आपली काय चूक झाली? यांना लायकीपेक्षा जास्त दिले, हीच आपली चूक झाली, असे म्हणावे लागेल. मागील 40 वर्षांत मुख्यमंत्र्यांनी जी खाती अन्य मंत्र्यांना दिली नव्हती, ती खातीदेखील त्यांना दिली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यांना सर्वकाही दिले. मात्र, त्यांनी पक्षप्रमुखांची प्रकृती ठीक नसताना, कठीण काळात साथ द्यायचे सोडून आपल्या गळाला कोण लागते, कोणाला फोडता येईल, याचे ठोकताळे बांधत पक्ष फोडायला सुरुवात केली. हे आपल्याला योग्य वाटते का?’ असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला, तेव्हा ‘गद्दारांचे करायचे काय… खाली मुंडी, वर पाय…’ अशा जोरदार घोषणा घुमल्या.

उद्धव ठाकरे यांना जनतेच्या हृदयात स्थान, हेच गद्दारांचे मूळ दुखणे

‘कोविडकाळात उद्धव ठाकरे यांनी कुटुंबप्रमुखाप्रमाणे महाराष्ट्रातील जनतेची काळजी घेतली. त्यांच्याशी सुसंवाद ठेवला. प्रचंड प्रमाणात विकासकामे केली. माणसासोबत निसर्गही सांभाळला. जातीय सलोखा उत्तम राहिला. कोठेही जातीय दंगली झाल्या नाहीत. सत्तेत आल्यावर पहिला निर्णय छत्रपती शिवरायांच्या रायगडासाठी 600 कोटी रुपयांचा निधी देण्याचा घेतला, तर शेवटचा निर्णय संभाजीनगर आणि धाराशिव नामांतराचा घेतला. उद्धव ठाकरे मेन स्ट्रीममध्ये येताहेत, त्यांना जनतेच्या हृदयात स्थान मिळतेय, हेच या गद्दारांचे मूळ दुखणे असेल,’ अशी घणाघाती टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

महाराष्ट्र तोडण्याचे राजकारण सुरू

‘ठाकरे परिवाराला एकटे पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाराष्ट्र तोडण्याचे राजकारण सुरू आहे. पण आज मी जेव्हा महाराष्ट्रभर फिरत आहे, तेव्हा सर्वत्र मला जे प्रेम मिळत आहे, हीच आमची ताकद आहे आणि हेच आमचे कुटुंब आहे,’ असे उद्गार आदित्य ठाकरे यांनी काढताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. ‘मी आज तुमच्याकडे प्रेम आणि आशीर्वाद मागायला आलो आहे,’ असे आदित्य ठाकरे म्हणाले.

तत्पूर्वी माजी आमदार दगडूदादा सकपाळ, माजी जिल्हाप्रमुख नरेंद्र पाटील यांच्यासह शिवसैनिकांची आवेशपूर्ण भाषणे झाली. यावेळी जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल आदित्य ठाकरे यांच्या हस्ते हर्षद कदम यांचा भगवी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या मेळाव्यास शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत, शिवसेना सचिव आदेश बांदेकर, शिवसेना उपनेते व सातारा-सांगली जिल्हा संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील, जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, उपजिल्हाप्रमुख अमोल आवळे, माजी आमदार सदाभाऊ सपकाळ, युवासेनेचे सातारा जिल्हा युवा अधिकारी रणजितसिंह भोसले, हनुमंत चवरे, महिला आघाडीच्या छाया शिंदे, बाळासाहेब शिंदे, भानुदास पोळ यांच्यासह जिह्यातील शिवसेना, युवासेना, तसेच महिला आघाडीच्या आजी-माजी पदाधिकारी व हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.

रणरणत्या उन्हातही रस्त्याच्या दुतर्फा तुफान गर्दी

आदित्य ठाकरे यांच्या मल्हार पेठ दौऱयाकडे पाटण तालुक्यासह संपूर्ण जिह्याचे लक्ष लागले होते. रणरणते ऊन आणि असह्य उकाडय़ातही हजारोंचा जनसमुदाय त्यांचे भाषण ऐकण्यासाठी आतुर झाला होता. निसरे फाटय़ापासून मल्हार पेठकडे येत असताना रस्त्याच्या दुतर्फा तुफान गर्दी झाली होती. ही गर्दी नियंत्रित करताना पोलिसांची दमछाक होत होती. त्यांचे आगमन होताच फटाक्यांच्या आतषबाजीत आणि ‘कोण आला रे कोण आला… शिवसेनेचा वाघ आला’, ‘शिवसेना झिंदाबाद’ अशा घोषणांनी त्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी सुवासिनींनी त्यांचे औक्षण केले. त्यानंतर व्यासपीठावर येऊन आदित्य ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर उपस्थितांपुढे नतमस्तक होऊन त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.