शिवसेनेचाच व्हीप अधिकृत, कुणाच्याही खास प्रेमाची गरज नाही! आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांना सुनावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेच्या 15 आमदारांना बंडखोरांकडून नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांनी त्यातून माझे नाव वगळले असले तरी मला कुणाच्याही खास प्रेमाची गरज नाही. शिवसेनेचाच व्हीप अधिकृत असून त्याचे पालन केले नाही त्यांच्यावर कारवाई होणारच. शिवसेनेशी ज्यांनी गद्दारी केली त्यांनी राजीनामा द्यावा, निवडणुकीला सामोरे जावे, आम्ही आजही तयार आहोत, अशा शब्दांत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांना सुनावले.

शिवसेना भवन येथील महिला जिल्हाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची बैठक संपल्यानंतर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, सध्याची राजकीय परिस्थिती पाहता मध्यावधी निवडणुका लागणार, अशी शक्यता आहे. या मध्यावधी निवडणुका लागल्या तरी त्या जिंकण्याची आमची पूर्ण तयारी आहे.

मुख्यमंत्र्यांचे भाषण ऐकले नाही, शिवसैनिकांचा आवाज ऐकतोय

आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्र्यांचे भाषण ऐकले का, असे पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, मी मुख्यमंत्र्यांचे भाषण ऐकले नाही. पण शिवसैनिकांचा आवाज उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. तो त्यांचा आवाज ऐकतोय. शिवसेनेसोबत एकनिष्ठ असलेले आमदार आणि शिवसैनिक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. गेली अडीच वर्षे कोणतीही टीकाटिप्पणी केली नाही, नेहमी चांगल्या कामांवर बोललो. आताही चांगलेच बोलेन, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.