
वरळी विधानसभा क्षेत्रातील महायुतीचे उमेदवार शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा रविवारी लोअर परळ ते वरळी असा दणदणीत रोड शो झाला. ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’ अशा गगनभेदी घोषणा आणि डौलाने फडकणाऱया भगव्यामुळे परिसर भगवामय झाला होता. रोड शोदरम्यान आदित्य ठाकरे यांचे ठिकठिकाणी हारतुरे देऊन, पुष्पवृष्टी करत नागरिकांनी जोरदार स्वागत केले. तसेच महिलांनी औक्षणही केले.
आदित्य ठाकरे यांच्या प्रचारासाठी सायंकाळी लोअर परळ येथील शिवालय हॉलपासून रोड शोला सुरुवात झाली. लोअर परळ स्टेशन, लोअर परळ मार्केट, बीडीडी चाळ, सेंच्युरी मिल, गणपतराव कदम मार्गावरून पुढे जांबोरी मैदानापर्यंत दणदणीत रोड शो झाला. यावेळी सौ. रश्मी उद्धव ठाकरे, तेजस ठाकरे, श्रीधर पाटणकर, केंद्रीय मंत्री अरविंद सावंत, आमदार सुनील शिंदे, माजी राज्यमंत्री सचिन अहिर, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, नगरसेवक अरविंद भोसले, माजी महापौर महादेव देवळे यांच्यासह शिवसेना, भाजप, रिपाइंचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
वृत्तपत्र विक्रेत्यांचा पाठिंबा
आदित्य ठाकरे यांना सर्वच स्तरांतील सामजिक संस्थांचा, सर्वजनिक मंडळांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. त्यानुसार आज वरळी विभागातील वृत्तपत्र विक्रेता आणि वितरकांनी रोड शोमध्ये सहभागी होऊन आदित्य ठाकरे यांना पाठिंबा दिला.



























































