विकासापासून दूर राहिलेल्या प्रत्येकापर्यंत पोहचाचंय, आदित्य ठाकरे यांची दणदणीत सभा

नवा महाराष्ट्र घडवण्याचे माझे स्वप्न आहे. कर्जमुक्त, बेरोजगारीमुक्त, प्रदूषणमुक्त, दुष्काळमुक्त महाराष्ट्र मला साकार करायचा आहे. विकासापासून दूर राहिलेल्या शेवटच्या स्त्री-पुरुषापर्यंत मला पोहचायचेय. त्यांचे स्वप्न मला पूर्ण करायचे आहे. मुंबईच्या विकासाचे मॉडेल गावोगावी न्यायचे आहे. हा स्वप्नातला महाराष्ट्र आपण साकारूया, असे आवाहन शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.

महायुतीचे उमेदवार पांडुरंग सकपाळ यांच्या प्रचारासाठी आज आदित्य ठाकरे यांची दुर्गादेवी चौक, कुंभारवाडा येथे दणदणीत सभा झाली त्यावेळी आदित्य ठाकरे बोलत होते. मुंबादेवी हा मतदारसंघ शिवसेनेसाठी खूप खास आहे. माता मुंबादेवीच्या नावाने त्याची ओळख आहे. आज सभेला महिलांची मोठी गर्दी झाली आहे. एवढी मोठी स्त्राrशक्ती समोर असताना आपण हरूच शकत नाही. स्त्राrशक्तीचा विजय होणारच. मुंबादेवीत भगवा फडकणारच, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. पांडुरंग सकपाळ म्हणजे दिवसाचे 24 तास काम करणारा शिवसैनिक आहे, असेही ते म्हणाले. यावेळी शिवसेना खासदार-केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंत, मलबार हिल मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार मंगलप्रभात लोढा, भाजप नेत्या शायना एन. सी., उपनेत्या मीना कांबळी आदी उपस्थित होते.

जुन्या इमारतींचा पुनर्विकास

मुंबादेवी मतदारसंघात महापालिकेचे बी, सी आणि ई वॉर्ड येतात. येथील 70 टक्के इमारती मोडकळीस आल्या आहेत. इथे अनेक इमारती कोसळून लोक मृत्युमुखी पडले आहेत. आपल्याला मुंबादेवी मतदारसंघ सुरक्षित करायचा आहे. जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा महत्त्वाचा प्रश्न प्राधान्याने हाती घेईन, असे पांडुरंग सकपाळ यावेळी म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या