यापुढे आता राष्ट्रवादच जिंकेल! आदित्य ठाकरे यांचा पाटण, रहिमतपूर, कोरेगावमध्ये झंझावात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘‘मी मत मागायला आलो नाही तर नवमहाराष्ट्र घडविण्यासाठी तुमची मला साथ पाहिजे’’ अशी साद घालत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ‘‘तुम्ही माझ्यासोबत आहात का?’’ असे विचारताच जमलेल्या विराट गर्दीने हात उंचावून प्रतिसाद दिला. ‘‘आज जे वातावरण आहे तेच 24 तारखेला दिसणार आहे. आजवर पाटणमध्ये राष्ट्रवादी जिंकत होती पण आता ‘राष्ट्रवाद’ जिंकणार आहे’’ असा जबरदस्त आत्मविश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

पाटण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार शंभूराज देसाई यांच्या प्रचारार्थ मल्हार पेठ येथे झालेल्या सभेत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे बोलत होते. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीतील महायुतीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले, शिवसेना उपनेते, सातारा-सांगलीचे संपर्पप्रमुख नितीन बानुगडे-पाटील, सातारा जिल्हाप्रमुख जयवंत शेलार आदी यावेळी उपस्थित होते.

आदित्य ठाकरे म्हणाले, ‘‘शंभूराज देसाई यांच्या प्रचाराची खरंच गरज आहे का? 12 महिने 365 दिवस 24 तास दिवसरात्र लोकांची सेवा करतो त्याला प्रचाराची गरज नसते. त्यामुळे मी इथे जनतेचे प्रेम आणि आशीर्वाद घ्यायला आलो आहे. संपूर्ण महाराष्ट्र फिरताना मला सगळीकडे भगवा, भगवा आणि भगवाच दिसतो आहे. महायुतीचे सरकार जे बोलते ते करून दाखवत आहे. त्यामुळे या सरकारला जनतेची साथ आहे. विकास करणार म्हणजे करणारच!’’ असे सांगत ‘‘आमचंही असंच आहे. ‘‘एक बार कमिटमेंट कर दी तो मैं आपने आप की भी नहीं सुनता’’ असे आदित्य ठाकरे यांनी म्हणताच जनसमुदायाने एकच जल्लोष केला.

काँगेस-राष्ट्रवादीने 15 वर्षे फुकट घालवली

‘‘काँगेस आणि भ्रष्टवादी आघाडीने 15 वर्षे फुकट घालवली. ती वर्षं महायुतीच्या सरकारने भरून काढली आहेत. आता त्यापुढे आपल्याला झेप घ्यायची असेल तर पुन्हा एकदा शिवसेना-भाजप महायुतीचे सरकार आणावेच लागेल असे म्हणताच उपस्थित जनसमुदायाने हात उंचावून आदित्य ठाकरे यांना प्रतिसाद दिला.

विकासाच्या आड येणार्‍यांचा जनताच ‘धनुष्यबाणा’ने वध करेल!

राज्यापुढे बेरोजगारी, कर्जबाजारीपणा, दुष्काळ असे प्रश्न दहातोंडी रावणासारखे उभे आहेत. या रावणाचा वध करायचा असेल तर धनुष्यबाणाशिवाय पर्याय नाही. येणार्‍या 21 तारखेला जनताच हातात धनुष्यबाण घेऊन विकासाच्या आड येणार्‍यांचा वध करेल आणि राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येईल असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.