
वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बुधवारी वरळी कोळीवाड्यात जाऊन तेथील ग्रामदैवतांचे दर्शन घेतले. तसेच तेथील नवरात्रोत्सव मंडळांना भेटी दिल्या. या वेळी कोळी बांधवांनी त्यांचे पारंपरिक पद्धतीने जल्लोषात स्वागत केले.
वरळी कोळीवाड्यात आदित्य ठाकरे यांचा प्रवेश होताच कोळी बांधवांच्या बँडने पारंपरिक कोळी गीतांची धून वाजवून त्यांचे स्वागत केले. वरळी कोळीवाडा शिवसेना शाखेमध्ये महिलांनी औक्षण केल्यानंतर कोळी बांधवांनी आदित्य ठाकरे यांना पारंपरिक लाल टोपी घातली. या वेळी शिवसेना झिंदाबादच्या घोषणांनी परिसर दुमदुमला. रस्त्याच्या दुतर्फा महिला आणि लहान मुलांनी आदित्य ठाकरे यांना पाहण्यासाठी गर्दी केली होती. त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला गेला. लहान मुलांनी आदित्य ठाकरे यांना हात मिळवून त्यांचे स्वागत केले. अबालवृद्धांनी त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या.
कोळीवाड्याचे ग्रामदैवत असलेल्या गोल्फादेवी मंदिरात जाऊन आदित्य ठाकरे देवीसमोर नतमस्तक झाले. महायुतीच्या विजयासाठी त्यांनी देवीला गाऱहाणे घातले. या वेळी कोळीवाड्यातील महिला पारंपरिक कोळी पेहरावात उपस्थित होत्या. तेथून साई मंदिर, संतोषी माता मंदिर, वरळी किल्ला येथील वेताळेश्वर मंदिर आणि विविध नवरात्रोत्सव मंडळांना आदित्य ठाकरे यांनी भेटी दिल्या.
याप्रसंगी आमदार सुनील शिंदे, उपमहापौर हेमांगी वरळीकर, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, माजी आमदार सचिन अहिर यांच्यासह विभागातील नगरसेवक, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख व अन्य पदाधिकार्यांसह शेकडो शिवसैनिक आणि युवासैनिक उपस्थित होते.
























































