शहापूरच्या आदिवासींचा मतदानावर बहिष्कार; नेहरोली पाणी योजना रखडली

शहापूर तालुक्यातील नेहरोलीलगत असलेल्या पंचक्रोशीतील पेढ्याची वाडी, कामत वाडी, सोनारशेत या आदिवासी वाड्या-वस्त्यांसाठी मंजूर केलेली नेहरोली नळपाणी पुरवठा योजना ठेकेदाराने अपूर्ण ठेवली आहे. त्यामुळे या भागातील आदिवासी पाणीटंचाईने त्रस्त झाले आहेत. त्यामुळे त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.

जलजीवन योजनेंतर्गत दीड कोटीची मंजूर झालेली पाणीपुरवठा योजनाच गेली दोन वर्षे रखडल्याने पाणीटंचाईत होरपळणाऱ्या नेहरोली, पेढ्याची वाडी, कामत वाडी आणि सोनारशेतमधील संतप्त आदिवासींनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर सामुदायिक बहिष्कार घालण्याचा निश्चय केला आहे. याप्रकरणी सरपंच कांता हंबीर व उपसरपंच रेखा दांडकर या दोन्ही महिलांच्या पुढाकाराने ग्रामस्थांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन चौकशी व कारवाई करण्याची मागणी केली आहे.

जव्हारच्या आदिवासी विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास
आकरे ग्रामपंचायत हद्दीतील शेकडो आदिवासी व त्यांच्या मुलाबाळांना दरवर्षी पावसाळ्यात दुथडी भरलेल्या नाल्यातून जीवघेणा प्रवास करावा लागतो. याबाबत अनेकदा आंदोलने करूनही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने गावकऱ्यांनी लोकसभा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे, अशी माहिती उज्ज्वल डोके यांनी दिली आहे.

काम अपूर्ण तरी ठेकेदाराला दिले लाखो रुपये
भगवती एण्टरप्रायजेसचे भगवान भोईर हे ठेकेदार असलेल्या या पाणीपुरवठा योजनेसाठी विहीर खोदण्यात आली होती, परंतु या विहिरीला पाणी लागले नाही म्हणून विहिरीचे बांधकाम केलेच नाही. त्यामुळे नेहरोली गावासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या विहिरीवरून तात्पुरता पाणीपुरवठा करू असे सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात आजपावेतो पाणीपुरवठा सुरू झाला नाही. येथील योजनेचे काम दोन वर्षांपासून बंद आहे. तीस टक्के काम पूर्ण असताना ठेकेदाराला लाखो रुपयांची देयके देण्यात आली आहेत.