जलजीवन मिशनमधील 579 योजनांना प्रशासकीय मंजूरी, 288 कामे सुरु, 33 पूर्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत 2021-22 या वर्षात 1181 योजना मंजूर होत्या. त्यामध्ये राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत 104 योजनांचा समावेश होता. एकूण 879 योजनांना तांत्रिक मान्यता देण्यात आली असून 569 योजनांना प्रशासकीय मंजूरी देण्यात आली आहे. मंजूर असलेल्या कामांपैकी 288 कामे सुरु असून 33 कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

जलजीवन मिशन ही केंद्र शासनाची महत्वाकांक्षी योजना राबवण्यात येत असून या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तिक नळजोडणीद्वारे किमान 55 लिटर प्रती दिन गुणवत्तापुर्ण पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत सन 2021-22 मध्ये 1181 योजना मंजूर होत्या. त्यामध्ये राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत 104 योजनांचा समावेश होता. सन 2022-23 मध्ये 1475 योजनांचा 82040.16 लक्ष रुपयांचा पालकमंत्र्यांमार्फत मंजूर आराखडा शासनास सादर करण्यात आला. त्यापैकी एकूण 879 योजनांना तांत्रिक मान्यता देण्यात आली व 569 योजनांना प्रशासकीय मंजूरी देण्यात आली.

मंजूर असलेल्या कामांपैकी 288 सुरु असून 33 कामे पूर्ण करण्यात आली. जलजीवन मिशन अंतर्गत तांत्रिक सल्लागार म्हणून 4 संस्थांची निवड करण्यात आली असून 1475 योजनांपैकी 305 योजनांचे अंदाजपत्रक व प्रस्ताव तयार करण्याचे काम तांत्रिक सल्लागार संस्थांकडे देण्यात आले आहे. तसेच जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामांची गुणवत्ता तपासणीसाठी राज्य पाणी व स्वच्छता मिशन, नवी मुंबई यांनी TVS SID South Asia Pvt. Ltd या संस्थेची निवड करण्यात आली आहे.

35 गावांमध्ये हर घर जल

जलजीवन मिशन अंतर्गत 100 टक्के नळ जोडणी असलेल्या 125 गावापैकी 35 गावांना हर घर जल घोषित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जलजीवन मिशन अंतर्गत पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रम राबवला जातो. जिल्ह्यात 846 ग्रामपंचायतींमध्ये 7,790 सार्वजनिक स्त्रोत आहेत. गावातील सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची रासायनिक तपासणी वर्षातून एकदा 1 ऑक्टोबर ते 31 मार्च या कालावधीत व पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची व घरगुती नळ कनेक्शनद्वारे पुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्याची जैविक तपासणी वर्षातून दोनदा 1 जून ते 31 ऑक्टोबर व 1 नोव्हेंबर ते 31 या कालावधीत करण्यासाठी पाण्याचे नमुने गोळा करून विहित मुदतीत जवळच्या कार्यकक्षेतील प्राथमिक आरोग्य केंद्रात जमा करण्यात येते.