
तालिबानच्या दहशतीमुळे अफगाणिस्तानाबाहेर पडण्यासाठी हजारो नागरिकांची धडपड सुरू असतानाच शनिवारी एका अपहरणनाटय़ाने जगभरात खळबळ उडाली. काबूल विमानतळाकडे जाणाऱया 150 नागरिकांचे तालिबान्यांनी अपहरण केले. त्यात बहुतांशी हिंदुस्थानी असल्याचे वृत्त झळकले. काही वेळानंतर तालिबानने हे अपहरण नसून नागरिकांच्या कागदपत्रांची तपासणी केल्याचे म्हटले आहे. मात्र अफगाणिस्तानात अडकलेल्या हिंदुस्थानींची चिंता आणखी गंभीर बनली आहे. दरम्यान, सरकार स्थापन करण्यासाठी तालिबानने हालचाली सुरू केल्या आहेत.
तालिबान्यांनी कब्जा केल्यापासून अफगाणिस्तानातील जनतेमध्ये प्रचंड दहशत आहे. हजारो नागरिकांना देशाबाहेर पडायचे आहे. जगात इतर कोणत्याही देशात राहण्याची नागरिकांची तयारी आहे. त्यामुळे आपले घर, व्यवसाय सोडून नागरिकांची आठ दिवसांपासून काबूल विमानतळावर प्रचंड गर्दी आहे. सध्या काबूल विमानतळ अमेरिकन सैनिकांच्या ताब्यात असले तरी तेथे तालिबान्यांनी शिरकाव केला असून लोकांमध्ये दहशत पसरविली जात असल्याचे अपहरणनाटय़ावरून स्पष्ट झाले.
काय घडले?
– स्थानिक अफगाण माध्यमांच्या हवाल्याने ‘एएनआय’ने वृत्त दिले. विमानतळाबाहेर 150 नागरिकांना तालिबान्यांनी ताब्यात घेऊन अपहरण केले. यामध्ये बहुतांशी हिंदुस्थानी नागरिक असून काही अफगाणिस्तानातील शीख नागरिकांचाही समावेश आहे. तसेच काही हिंदुस्थानींना मारहाण करण्यात आल्याचे या वृत्तात म्हटले होते. यामुळे हिंदुस्थानसह जगभरात खळबळ उडाली.
– काही वेळानंतर तालिबानने अपहरणाचे वृत्त फेटाळल्याची माहिती अफगाणिस्तानामधील माध्यमांनी दिली. तालिबानचा प्रवक्ता अहम्मदुल्लाह वसीक याने अपहरण झाले नाही. 150 जणांच्या पासपोर्ट आणि इतर कागदपत्रांची तपासणी केली. त्यानंतर दुसऱया मार्गाने त्यांना विमानतळावर सोडण्यात आल्याचे अहम्मदुल्लाहने सांगितले.
– दरम्यान, काबूल विमानतळाच्या हद्दीत शिरण्याचा प्रयत्न नागरिकांकडून सुरू होता. तेवढय़ात तालिबानींचा एक गट आला आणि सर्वांना घेउैन गेला. व्हॅनच्या खिडकीतून उडी मारल्यामुळे आपण बचावलो असे एका नागरिकाने म्हटले आहे. त्यामुळे अपहरणनाटय़ाचे गूढ कायम आहे.
85 हिंदुस्थानींना ताजिकिस्तानमध्ये पोहचविले
अपहरणनाटय़ रंगले असतानाच हवाई दलाच्या विमानाने काबूलमधून 85 हिंदुस्थानींना बाहेर काढले. हे विमान ताजिकिस्तानमध्ये उतरविण्यात आले. बचावकार्यासाठी आणखी विमान अफगाणला पाठविण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.
31 ऑगस्टनंतर सरकार स्थापन होणार
z अफगाणिस्तानातून अमेरिकेचे पूर्ण सैन्य माघारीची डेडलाइन 31 ऑगस्ट असल्याचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी यापूर्वीच जाहीर केली आहे. त्यामुळे 31 ऑगस्टनंतरच तालिबान सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे.
z राष्ट्रपतीपदाचा दावेदार तालिबानचा नंबर दोन मुल्ला अब्दुल गनी बरादर हा काबूलमध्ये दाखल झाला असून अफगाणी नेत्यांबरोबर वाटाघाटी आणि चर्चा सुरू केल्या आहेत. विशेषतः माजी राष्ट्रपती हमीद करझाई यांच्याबरोबर मुल्ला बरादरने अनेकवेळा चर्चा केल्याचे वृत्त आहे.
अशरफ गनींच्या भावाची तालिबानशी हातमिळवणी
अफगाणिस्तानाबाहेर पळून गेलेले राष्ट्रपती अशरफ गनी यांचा भाऊ हशमत गनी अहमदजई याने तालिबानशी हातमिळवणी केली आहे. हशमत गनीच्या अफगाणिस्तानबरोबरच अमेरिका, दुबई आणि पाकिस्तानात कोटय़वधी रुपये किमतीच्या जमिनी आहेत. अशरफ गनी राष्ट्रपती असताना हशमत आणि एका अमेरिकन कंत्राटदाराला त्यांनी खनिज प्रक्रियेचा परवाना दिला होता. आर्थिक व्यवहारांसाठी हशमत गनीने तालिबानशी हातमिळवणी केल्याचे वृत्त आहे.
तालिबान्यांविरुद्ध असंतोष कायम
तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा मिळवला असला तरी काही भागात तालिबान्यांविरुद्ध असंतोष असल्याचे वृत्त आहे. विशेषतः पंचशीर येथे उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांच्यासह अहमद मसूद, अली मोहंमद नूर यांनी तालिबान्यांना शिरकाव करू दिलेला नाही. जलालाबादमध्ये तालिबान्यांना विरोध कायम आहे. तालिबान्यांच्या गोळीबारात तीन नागरिक ठार झाले. काही जिह्यांत नागरिकांबरोबरच्या धुमश्चक्रीत तालिबानी दहशतवादी ठार झाल्याचे वृत्त आहे.
तालिबान म्हणते शीख, हिंदूंनी देश सोडू नये
एका गटाकडून दहशत, गोळीबार आणि दुसऱया गटाकडून चर्चा आणि वाटाघाटी असे नाटक तालिबान्यांनी सुरू ठेवले आहे. अफगाणिस्तानातील शीख, हिंदूंनी देश सोडून जाऊ नये. हा देश त्यांचाही आहे असे तालिबानच्या एका गटाने म्हटले आहे. दरम्यान, काबूल येथील गुरुद्वारात शीख, हिंदूंनी आश्रय घेतला आहे. तालिबानचा राजकीय प्रवक्ता एम. नईम याने गुरुद्वार येथे जाऊन भेट घेतली आणि सुरक्षेची हमी दिल्याचे वृत्त अल-जझीराने दिले आहे.
































































