वासनांध तालिबानी ‘त्या’ पुरुषांच्या शोधात, एकावर बलात्कार करून केली बेदम मारहाण

अमेरिकेने अफगाणिस्तानातून बोऱ्या बिस्तरा गुंडाळल्यानंतर तालिबानने तिथे आपले संपूर्ण वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तालिबानी राजवटीमुळे तिथली लोकं जबरदस्त घाबरली आहेत. आपण पूर्वीसारखे नसून आपण बदललो आहोत, हे सांगण्याचा तालिबानने प्रयत्न केला, मात्र त्यांच्या दहशतवाद्यांनी तालिबानच्या दाव्यांना हरताळ फासत आपले क्रूर आणि हिंसक उद्योग सुरूच ठेवले आहेत. महिलांना काही प्रमाणात स्वातंत्र्य देण्याचेही तालिबानने जाहीर केले होते, मात्र तसे घडताना अद्याप दिसलेले नाहीये. अफगाणिस्तानातील महिला घाबरलेल्या आहेत, मात्र त्यांच्यासोबत काही पुरुषही घाबरले आहेत.

डेली मेलने प्रसिद्ध केलेल्या बातमीत म्हटलंय की तालिबानच्या दहशतवाद्यांनी एका समलिंगी पुरुषावर बलात्कार करून त्याला बेदम मारहाण केली. या माणसाला दोन दहशतवाद्यांनी आपण मैत्री करूया असं सांगून बोलावलं होतं. या दोघांनी त्याला काबूलमध्ये लवपण्याचं आमीषही दाखवलं होतं. कालांतराने तुला देशाबाहेर पाठवण्याचीही व्यवस्था करू असंही त्याला सांगितलं होतं. या दोघांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून समलिंगी तरुण त्यांना भेटायला गेला तेव्हा दहशतवाद्यांनी त्याच्यावर बलात्कार केला आणि बेदम मारहाणही केली. या दहशतवाद्यांनी समलिंगी पुरुषाकडून त्याच्या वडिलांचा नंबरही घेतला. तुमचा मुलगा समलिंगी आहे हे सांगण्यासाठी त्यांनी हा नंबर घेतला असं डेली मेलच्या बातमीत म्हटलंय.

आर्टेमिस अकबरी हे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. अकबरी हे सध्या तुर्कस्थानात राहतात. आपण पीडित पुरुषाच्या संपर्कात होतो असं त्यांनी सांगितलं आहे. तालिबानी राजवटीत समलिंगी पुरुषांची काय हालत होणार आहे हे या घटनेवरून कळतं असं अकबरी म्हणालेत. आम्ही बदललोय असा दावा करणारे ताबिलानी खोटारडे असून ते अजिबात बदललेले नाहीत असं अकबरी यांनी म्हटलंय. अफगाणिस्तानचे समलिंगी लेखक नेमत सदात यांनी या घटनेनंतर प्रतिक्रिया देताना म्हटलंय की तालिबान समलिंगी व्यक्तींना शोधून शोधून ठार मारतंय.

आपली प्रतिक्रिया द्या