#AfghanistanBombBlast – अफगाणिस्तानात मशिदीत बॉम्बस्फोट; 50 हुन अधिक लोकांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अफगाणिस्तानात एका मशिदीत बॉम्बस्फोट झाल्याची बातमी समोर येत आहे. या बॉम्ब स्फोटात 50 हुन अधिक लोकांचा मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा बॉम्बस्फोट अफगाणिस्तानातील कुंदुज येथील मशिदीत झाला आहे. एफपी न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, अलीकडेच काबूलमधील मशिदीच्या दारावर बॉम्ब ब्लास्ट झाला होता. ज्यात पाच अफगाणी नागरिकांचा मृत्यू झाला होता.

अफगाणिस्तानच्या तुलू न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, हा बॉम्बस्फोट कुंदुजच्या सय्यद अबाद येथे झाला आहे. मशिदीत शुक्रवारची नमाज सुरू असताना हा बॉम्बस्फोट झाला आहे. तालिबान सरकारमध्ये मंत्री असलेला जबीउल्ला मुजाहिद याने तुलू न्यूजशी बोलताना मशिदीत बॉम्बस्फोट झाला असल्याचे सांगितले. तसेच तो पुढे म्हणाला की,”कुंदुजमधील खानाबाद बंदर भागात आज दुपारी एका शिया मशिदीला लक्ष्य करण्यात आले. यात आपल्या देशातील अनेक लोक शहीद झाले आणि अनेक जखमी झाले.”

300 हुन अधिक लोक अदा करत होते नमाज

ज्या ठिकाणी ही घटना घडली तेथील स्थानिक सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, हा बॉम्बस्फोट झाला त्यावेळी 300 हुन अधिक लोक नमाज अदा करत होते.

काबुल मशिदीतही झाला होता बॉम्ब ब्लास्ट

अलीकडेच काबूलमधील ईदगाह मशिदीला लक्ष्य करून बॉम्बस्फोट झाला. हा स्फोट झाला त्यावेळी तालिबानचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद याच्या आईच्या स्मरणार्थ मशिदीत नमाज आयोजित करण्यात अली होती.