
आयर्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन-डे क्रिकेट सामन्यात अफगाणिस्तानने 3 विकेट्स आणि 31 चेंडू राखून बाजी मारत 2027च्या वन-डे विश्वचषक स्पर्धेचे थेट तिकीट पक्के केले. प्रथम गोलंदाजी करताना अफगाणिस्तानने आयर्लंडचा डाव 46.3 षटकांत अवघ्या 206 धावांत गुंडाळला. त्यानंतर 44.5 षटकांत 7 विकेट्सच्या मोबदल्यात लक्ष्य गाठत अफगाणिस्तानने विश्वचषकाचे तिकीट मिळविले.
या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो अफगाणिस्तानचा स्टार अष्टपैलू राशीद खान. त्याने आधी गोलंदाजी करताना 3 बळी टिपले आणि त्यानंतर फलंदाजीत नाबाद 37 धावांची झुंजार खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. अफगाणिस्तानची अवस्था एकवेळ 176 धावांवर 7 बाद अशी झाली होती. विजयासाठी आवश्यक धावसंख्या जवळ येऊनही संघ अडचणीत सापडला होता. मात्र राशीद खानने संयम राखत डाव सावरला. त्याने 43 चेंडूंत नाबाद 37 धावा ठोकताना चार चौकार लगावले. त्याला यामीन अहमदजईने खंबीर साथ दिली. यामीनने 26 चेंडूंत नाबाद 4 धावा केल्या. दोघांनी अखेर 44.5 षटकांत अफगाणिस्तानला लक्ष्यापर्यंत पोहोचवत विजयावर शिक्कामोर्तब केले.
क्रमवारीत मिळविले आठवे स्थान
आयर्लंडवर मिळविलेला हा अफगाणिस्तानचा सलग दुसरा विजय ठरला. वन-डे क्रमवारीत अफगाणिस्तान सध्या आठव्या स्थानावर आहे. या विजयामुळे 30 सप्टेंबर 2026 या विश्वचषक पात्रतेच्या कटऑफ तारखेपर्यंत संघाला क्रमवारीतील टॉप-8मध्ये स्थान कायम राखता येणार आहे. त्यामुळे पात्रता फेरीच्या फेऱयात न अडकता अफगाणिस्तानने थेट विश्वचषकात प्रवेश निश्चित केला.
विंडीजला आता पात्रता फेरीत खेळावेच लागेल
अफगाणिस्तानच्या थेट पात्रतेमुळे वेस्ट इंडीजसाठी मात्र विश्वचषकाची वाट खडतर झाली आहे. हिंदुस्थानविरुद्ध वेस्ट इंडीजला दोन वन-डे सामने खेळायचे आहेत. हे सामने जिंकले, तरी विंडीजला वन-डे क्रमवारीतील टॉप-8मध्ये पोहोचता येणार नाही. सध्या वेस्ट इंडीज दहाव्या क्रमांकावर आहे.
त्यामुळे 2027च्या विश्वचषकासाठी वेस्ट इंडीजला पात्रता फेरीतून मार्ग काढावा लागणार आहे. एकेकाळी विश्वचषकाच्या मैदानावर दबदबा गाजवणाऱया विंडीजसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
अझमतुल्ला ओमरझाईला ताकीद
आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेतल्याबद्दल अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू अझमतुल्ला ओमरझाईला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल ओमरझाईला अधिपृतपणे फटकारले आहे. आयसीसीने ओमरझाईच्या शिस्तभंगाची कारवाई करत त्याला ताकीद देताना एक डिमेरीट पॉइंटही दिला आहे. गेल्या 24 महिन्यांतील हा त्याचा पहिलाच गुन्हा होता. अजून एकदा त्याने बेशिस्त कामगिरी केली तर त्याच्यावर बंदीची कारवाई केली जाऊ शकते.
अफगाणिस्तानच्या डावाच्या 41व्या षटकात ही घटना घडली. मैदानातील पंचांनी बाद घोषित करूनही ओमरझाई लगेच पॅव्हेलियनमध्ये परतला नाही. तो बराच वेळ क्रीजवर उभा राहिला. तो स्वतःकडे हातवारे करत पंचांच्या निर्णयावर तीव्र असमाधान व्यक्त करत होता. मैदानातील पंच गॅरेथ मॉरिसन आणि रोली ब्लॅक, तिसरे पंच जॉनी केनेडी आणि चौथे पंच जॉर्ज ब्रॉली या सर्वांनी त्याच्यावर नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप लावला. त्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली.
चौथ्यांदा विश्वचषकाच्या मैदानात अफगाणिस्तान
2027चा वन-डे विश्वचषक दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे होणार आहे. अफगाणिस्तानचा हा वन-डे विश्वचषकातील चौथा सहभाग असेल. राशीद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानने पुन्हा एकदा मोठय़ा मंचावर आपली जागा पक्की केली आहे. दुसरीकडे वेस्ट इंडीजसारख्या दिग्गज संघाला पात्रता फेरीतून लढण्याची वेळ आल्याने विश्वचषकाच्या शर्यतीतील समीकरणे मात्र चांगलीच बदलली आहेत.





























































