
अफगाणिस्तानला कट्टरतावाद आणि दहशतवादाचा अड्डा बनण्यापासून रोखले पाहिजे. यासाठी वैश्विक लढा गरजेचा आहे. कट्टरतावाद, दहशतवाद आणि अमली पदार्थांची तस्करी यांच्या अभद्र युतीविरोधात सर्व देशांनी संयुक्तपणे लढा द्यावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी जी-20 शिखर परिषदेत बोलताना केले.
अफगाणिस्तानातील संकटाच्या पार्श्वभूमीवर आयोजित जी-20 शिखर परिषदेत मोदींनी व्हर्चुअल माध्यमातून सहभाग घेतला. परिषदेत अफगाणिस्तानातील मानवी गरजा, सुरक्षेची स्थिती, दहशतवादाविरुद्धची लढाई आदी प्रमुख मुद्दय़ांवर चर्चा झाली. मोदींनी अफगाणिस्तानच्या नागरिकांसाठी तत्काळ व निर्भीडपणे मदत करण्याचे आवाहन केले. तसेच त्यांनी हिंदुस्थान-अफगाणिस्तानच्या जुन्या संबंधांवर भाष्य केले.
मानवाधिकाराच्या नावाखाली देशाला बदनाम करू नका!
मानवाधिकाराची पायमल्ली झाल्याचा बोलबाला करून काही लोक देशाचीच जगात बदनामी करीत आहेत. मानवाधिकाराची व्याख्या आपल्या फायद्यानुसार करून देशाला बदनाम करण्याचे उद्योग करू नका, असे कळकळीचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या 28 व्या स्थापनादिन सोहळ्यात ते बोलत होते. देशातील नुकत्याच घडलेल्या काही घटनांचे राजकीयीकरण करणाऱया विरोधकांवर टीका करताना पंतप्रधानांनी हे मत व्यक्त केले आहे. याव्यतिरिक्त मोदी यांनी ट्रिपल तलाक, महिला सुरक्षा आणि कोरोना काळातील प्रवासी कामगारांच्या मदतीसह अनेक मुद्दय़ांवर आपले विचार व्यक्त केले.


























































