कोरोना नियंत्रणात आल्यानंतर बचत गटांमार्फत अंगणवाडी केंद्रात गरम ताजा आहार सुरु करणार!

राज्यात कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे अंगणवाडीतील बालके व गर्भवतींना पोषण आहार पुरविण्याचे कंत्राट महाराष्ट्र को.ऑपरेटिव्ह स्टेट फाऊंडेशन संस्थेला दिले असून कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर स्थानिक महिला मंडळ व बचत गटांमार्फत अंगणवाडी केंद्रात गरम ताजा आहार सुरु करण्यात येईल, असे महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकुर यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिले.

सदस्य धर्मरावबाबा आत्राम यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मंत्री श्रीमती ठाकुर म्हणाल्या की, राज्यात गेल्या वर्षापासून कोरोनाची साथ असल्याने अंगणवाडीस्तरावर दिला जाणारा गरम ताज्या आहार ऐवजी घरपोच आहार पुरवठ्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा साथीचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून हा निर्णय घेतला आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाड्या सुरु करण्याबाबत महिला व बाल विकास विभागाने आपत्तकालिन व्यवस्थापन विभागाकडे प्रस्ताव सादर केला असता पुढील आदेशापर्यंत अंगणवाडी केंद्र सुरु न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ताज्या गरम आहाराऐवजी घरपोच आहार सुरु ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव संपुष्टात आल्यानंतर अंगणवाडी केंद्र सुरु करण्यात येतील. त्यानंतर महिला मंडळ व बचत गटांमार्फत अंगणवाडी केंद्रात गरम ताजा आहार सुरु केला जाईल, असेही श्रीमती ठाकुर यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य भारती लव्हेकर, सर्वश्री संग्राम थोपटे, डॉ.संजय कुटे यांनी भाग घेतला.

आपली प्रतिक्रिया द्या