
मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू झाल्यानंतर रेल्वे बोर्डाने लगेचच सर्व लोकल ट्रेनना स्वयंचलित दरवाजा लावणार असल्याचे जाहीर केले. तो प्रस्ताव पुढे सरकण्याआधी रेल्वेच आता प्रवाशांना लोकलच्या दरवाजावर लटकण्यासाठी अतिरिक्त ‘ग्रॅब हॅण्डल’ लावणार आहे. हे ‘ग्रॅब हॅण्डल’ बसवण्यासाठी रेल्वे प्रशासन 2.40 कोटी रुपये खर्च करणार आहे. डब्यांच्या छताला जोडलेल्या आडव्या रॉड्सवर हे हॅण्डल बसवण्यात येणार आहेत.
मध्य रेल्वेच्या मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ 9 जून रोजी लोकलच्या गर्दीमुळे 13 प्रवासी खाली पडले. त्यातील चार प्रवाशांचा रुळावरच जागीच मृत्यू झाला. त्या घटनेने लोकलच्या गर्दीचा प्रश्न ऐरणीवर आला आणि विविध सुविधा उपलब्ध करण्यात रेल्वे प्रशासनाला आलेल्या अपयशावर टीका झाली. त्यानंतर लगेच रेल्वे बोर्ड आणि दुसऱया दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वयंचलित दरवाजाची योजना जाहीर केली होती. त्यापाठोपाठ आता मध्य रेल्वेने प्रवाशांना फूटबोर्डवर लटकण्यासाठी ‘ग्रॅब हॅण्डल’ बसवण्याची योजना विचारात घेतली आहे. फूटबोर्डवरचा प्रवास कमी धोकादायक करण्यासाठी हा उपाय असल्याचा दावा मध्य रेल्वे प्रशासनातील अधिकाऱयांनी केला आहे. अतिरिक्त ग्रॅब हॅण्डल लोकलच्या दरवाजाच्या आतील भागात डब्यांच्या छताला जोडलेल्या आडव्या रॉडवर लावले जाणार आहेत. रेल्वेच्या मालकीच्या सर्व सीमेन्स गाडय़ांमध्ये ग्रॅब हॅण्डल बसवण्यात येणार आहेत. इतर कंपन्यांनी बनवलेल्या गाडय़ांमध्ये आधीच दरवाजाजवळ ग्रॅब हॅण्डल बसवलेले आहेत. मध्य रेल्वे आपल्या ताफ्यातील 163 ट्रेनपैकी 138 ट्रेन मेन लाईन आणि हार्बर मार्गावर चालवते. या ट्रेन दररोज 39 ते 40 लाख प्रवाशांना सेवा देतात. यापैकी 113 ट्रेनची निर्मिती सीमेन्समार्फत करण्यात आली आहे.
ग्रॅब हॅण्डलसाठी निविदाही काढल्या
लोकलच्या दरवाजाजवळ अतिरिक्त ग्रॅब हॅण्डल बसवण्यासाठी निविदाही काढण्यात आल्या आहेत. ही प्रक्रिया पुढच्या दोन वर्षांतच पूर्ण केली जाणार आहे, अशी माहिती एका अधिकाऱयाने दिली. प्रत्येक कोचमधील प्रत्येक दरवाजाला चार ते सहा अतिरिक्त ग्रॅब हॅण्डल बसवले जाणार आहेत. यासंदर्भात सानपाडा वर्कशॉपमध्ये चाचण्या घेण्यात आल्या आहेत.