माथेरानची राणी धावली, पाच महिन्यांनंतर डोंगरदऱ्यातून शीळ गुंजली

तब्बल पाच महिन्यांनंतर माथेरानची राणी आज धुरांच्या रेषा हवेत काढीत झोकात धावली. डोंगरदऱ्यातून शीळ गुंजताच बच्चे कंपनी व प्रवाशांचा आनंद गगनात मावेनासा झाला. नेरळ स्थानकात श्रीफळ वाढवून भंडारा उधळत प्रवाशांनी राणीचा जयजयकार केला. हिरवा झेंडा दाखवताच निसर्गरम्य माथेरानच्या दिशेने राणीचा प्रवास दिमाखात सुरू झाला. आता रोज ठरलेल्या वेळापत्रकानुसार टॉय ट्रेन धावणार असून त्यामुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे.

मुसळधार पावसामुळे नेरळ ते माथेरानदरम्यानच्या रेल्वे मार्गावर दरडी कोसळल्या होत्या. दुरुस्तीच्या कामासाठी हा मार्ग बंद होता. पावसाळय़ानंतर दरवर्षी 15 ऑक्टोबरपर्यंत टॉय ट्रेनचा प्रवास सुरू व्हायचा, पण यंदा नोव्हेंबर उजाडला.

g माथेरानला जाणारी पहिली गाडी सकाळी 8.50 वाजता नेरळ स्थानकातून सुटली ती 11.30 वाजता माथेरानला पोहचली. लोकोपायलट म्हणून हरीश चिंचोळे यांनी सारथ्य केले.

g पहिल्या दिवशी नेरळ-माथेरानदरम्यान टॉय ट्रेनच्या दोन फेऱ्या झाल्या. त्यात 127 प्रवाशांनी प्रवास केला. त्यात गुजरातमधून आलेल्या प्रवाशांची संख्या जास्त होती.

g माथेरानमध्ये राणीचे दिमाखात आगमन होताच व्यापारी फेडरेशन अध्यक्ष राजेश चौधरी, ज्येष्ठ समाजसेवक जनार्दन पार्टे, मराठा समाज अध्यक्ष चंद्रकांत जाधव, प्रदीप घावरे, अरविंद शेलार, आकाश चौधरी, किरण चौधरी आदींनी पर्यटकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

विस्टाडोमला अल्प प्रतिसाद

नेरळ-माथेरान गाडीला विस्टाडोमचा डबादेखील जोडला आहे. त्यातील पारदर्शक छतामुळे पर्यटकांना माथेरानचा निसर्ग डोळय़ात साठवण्यात येणार आहे, मात्र त्याचे तिकीट जास्त असल्यामुळे पहिल्या दिवशी प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळाला. सुट्टीच्या दिवशी विस्टाडोम फुल्ल होईल असा विश्वास स्टेशन मास्तर गुरुनाथ पाटील यांनी व्यक्त केला.