
कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त डय़ुटी लादण्याच्या मुद्दय़ावरुन इंडिगो एअरलाईन्सप्रमाणे देशातील रेल्वेसेवा कोलमडली जाण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत लोको पायलट्सची अनेक पदे रिक्त असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण येत आहे. त्यांना पुरेशी विश्रांती मिळत नाही. याच मुद्दय़ावरुन लोको पायलट्सची संघटना आक्रमक झाली आहे. फॅटीग रिस्क मॅनेजमेंट सिस्टम तातडीने लागू करा, अशी मागणी ‘ऑल इंडिया लोको रनिंग स्टाफ असोसिएशन’ने सरकार आणि रेल्वे बोर्डाकडे केली आहे.
रेल्वे प्रशासन लोको पायलट्सच्या विविध प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा संघटनेचा आरोप आहे. भारतीय रेल्वेमध्ये सुमारे 1.47 लाख लोको पायलट कार्यरत असणे अपेक्षित आहे; परंतु त्यांची सध्याची संख्या केवळ 1.15 लाखांच्या आसपास आहे. सुमारे 30,000 लोको पायलटांची कमतरता असल्याने सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण येत आहे. गेल्या काही वर्षांत अनेक सुरक्षा पुनरावलोकन समित्यांनी लोको पायलटांसाठी शास्त्राrयदृष्टय़ा कामाच्या तासांची अंमलबजावणी करण्याची शिफारस केली.
तथापि, रेल्वेने त्यांची प्रभावी अंमलबजावणी केली नसल्याचे ‘ऑल इंडिया लोको रनिंग स्टाफ असोसिएशन’ने म्हटले आहे. अतिरिक्त डय़ुटीच्या प्रश्नावरून कर्मचारी संघटना वारंवार पत्रव्यवहार करीत आहेत; मात्र त्याकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्याने कर्मचारी संघटनांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. परिणामी, इंडिगोप्रमाणे रेल्वेसेवा विस्कळीत होऊन संपूर्ण देशभर त्याचा फटका बसू शकतो, अशीही भीती कामगार संघटना क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केली आहे.
विश्रांतीचे निश्चित वेळापत्रक लागू करा!
विश्रांतीच्या मुद्दय़ावरून लोको पायलट्समध्ये असंतोष खदखदत आहे. सरकारने तातडीने आधुनिक ‘फॅटीग रिस्क मॅनेजमेंट सिस्टम’ स्वीकारावी आणि या आधुनिक प्रणालीअंतर्गत विश्रांतीचे निश्चित वेळापत्रक लागू करावे, प्रत्येक शिफ्टनंतर 16 तासांची विश्रांती द्यावी, दररोज सहा तासांची कामाची मर्यादा आणि दैनंदिन विश्रांतीसोबतच साप्ताहिक विश्रांतीची व्यवस्था करावी, अशा विविध मागण्यांबाबत ‘ऑल इंडिया लोको रनिंग स्टाफ असोसिएशन’ने आवाज उठवला आहे.
रेल्वेला दरवर्षी तिकीट विक्रीच्या माध्यमातून 80 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होत आहे. गेल्या वर्षी 2 कोटी 40 लाखांहून अधिक लोकांनी रेल्वेने प्रवास केला. महसुलाचा आलेख वर्षागणिक उंचावत आहे. मात्र सरकार कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यात, कामाच्या तासांचे योग्य नियोजन करण्यात सपशेल अपयशी ठरल्याचा ‘ऑल इंडिया लोको रनिंग स्टाफ असोसिएशन’चा दावा आहे.


























































