
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंह याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. युवराजने सोमवारी याची अधिकृत घोषणा केली. ही घोषणा करताना तो भावूक झाला, तसेच भविष्यामध्ये काय करणार आहे याचीही माहिती दिली.
युवराजचे ‘हे’ 4 विक्रम त्याचा विस्फोटक अंदाज दाखवतात
युवराज सिंह गेल्या दोन वर्षापासून टीम इंडियातून बाहेर आहे. भविष्यामध्येही त्याचा संघात समावेश होईल की नाही हे स्पष्ट नसल्याने त्याने सन्मानपूर्वक निवृत्ती घेण्याची घोषणा केली. निवृत्तीनंतर भविष्यात पुढे काय करणार असा प्रश्न केला असता युवी म्हणाला की, आयुष्यातील एक मोठा काळ मी क्रिकेटला दिला असून आता पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. आता यापुढे कॅन्सर पीडित रुग्णांसाठी काम करण्याची, लोकांना मदत करण्याची इच्छा असल्याचेही युवी यावेळी म्हणाला.
#YuvrajSingh टीम इंडियाला 3 विश्वचषक जिंकून देणारा ‘किंग’
युवी म्हणाला, आगामी काळात You We Can या संस्थेच्या माध्यमातून देशभरातील कॅन्सर पीडित रुग्णांसाठी कॅम्प लावणार आहे. रुग्णांसाठी फंड गोळा करण्यासाठी मदत करणार आहे. युवराज सिंह हा स्वत: कॅन्सरने पीडित होता आणि त्यावर त्याने विजय मिळवला. 2011 च्या वर्ल्डकपवेळी युवराज कॅन्सरने ग्रस्त होता, परंतु त्याची तमा न बाळगता युवीने सर्वोत्तम कामगिरी करत टीम इंडियाला विश्वचषक जिंकून दिला होता.



























































