
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘सिक्सर किंग’ नावाने ओळखला जाणारा टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंह याने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये युवराज सिंह याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. 2011 मध्ये झालेल्या क्रिकेट वर्ल्डकपमध्ये आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर युवराजने टीम इंडियाला एकहाती विश्वचषक जिंकून दिला होता. सिक्सर किंग युवराजने टीम इंडियाला तीन वेळा विश्वचषक जिंकून दिला आहे.
युवराजने सर्वात प्रथम 1999 मध्य़े झालेल्या अंडर 19 विश्वचषक स्पर्धेत आपली छाप सोडली आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटला आपली दखल घेण्यास भाग पाडले. त्यानंतर 2007 मध्ये झालेल्या पहिल्या टी-20 वर्ल्डकपमधील युवराजने इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर ठोकलेले सलग 6 षटकार त्याला खऱ्या अर्थाने ‘सिक्सर’ किंगची उपमा देऊन गेले. त्यानंतर 2011 ला कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा सामना करताना युवराजने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामध्ये अफलातून कामगिरी करत 28 वर्षानंतर टीम इंडियाला विश्वचषक जिंकून दिला. या वर्ल्डकपमध्ये युवराजला मालिकावीरचा किताब देऊन गौरवण्यात आले.
JUST IN: Yuvraj Singh, Player of the Tournament at #CWC11, has announced his retirement from international cricket. pic.twitter.com/fqzEO1CnpH
— ICC (@ICC) June 10, 2019
























































