पारसी डेअरी फार्मच्या 110 वर्षांच्या परंपरेत रॅपची जोड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसिद्ध पारसी डेअरी फार्मने यंदाच्या दिवाळीनिमित्त एक नवा आणि आधुनिक प्रयोग केला आहे. संस्थेने तरुणाईशी संवाद साधण्यासाठी ‘धिस इज दिवाळी, गिव्हिंग’ हा 70 सेकंदांचा रॅप व्हिडीओ तयार केला आहे. मुंबईचा प्रसिद्ध रॅपर ‘मोहक’ याच्यासोबत मिळून हा रॅप तयार करण्यात आला आहे.

मरीन लाइन्स येथील पारसी डेअरी फार्मच्या ऐतिहासिक दुकानात या व्हिडीओचे चित्रीकरण करण्यात आले आहे. यात दिवाळीचा आनंद, कौटुंबिक आपुलकी आणि मिठाईच्या माध्यमातून प्रेम व्यक्त करण्याची परंपरा उत्तमरीत्या दाखवण्यात आली आहे. याशिवाय ब्रॅण्डचे प्रसिद्ध बरेल पेढा, सुतरफेणी, कुल्फी, तूप या पारंपरिक पदार्थांसोबतच चॉकलेट ड्रजे आणि ड्रायफ्रूट्सच्या आकर्षक दिवाळी हॅम्पर्सची झलकही यात पाहायला मिळते. कुटुंबाच्या चौथ्या पिढीद्वारे चालवला जाणारा हा ब्रॅण्ड जुन्या परंपरेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत नव्या पिढीपर्यंत पोहोचत आहे. या रॅपचा ऑडिओ इन्स्टाग्रामवर उपलब्ध असून ग्राहकांना त्यावर स्वतःचे दिवाळी रील्स तयार करता येणार असल्याची माहिती ब्रॅण्डच्या मार्केटिंग संचालक झीनिया पटेल यांनी दिली आहे.