
500च्या बनावट नोटांची तस्करी करणाऱयाला धारावी पोलिसांनी अटक केली. एतशाम अथर हुसैन शेख असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून 500 रुपयांच्या 15 बनावट नोटा जप्त केल्या. एतशामला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
तक्रारदार हे धारावी येथे राहत असून त्याचा मोबाईल दुरुस्तीचा आणि मनी ट्रान्स्फरचा व्यवसाय आहे. शुक्रवारी सकाळी एक जण त्याच्या दुकानात आला. त्याने तक्रारदार यांना सात हजार रुपये देऊन ते पैसे एका नंबरवर पाठवण्यास सांगितले. तक्रारदार याने त्या नोटा मोजल्या. त्या 500 रुपयांच्या 14 नोटा होत्या. त्यानंतर तक्रारदार याने त्या नोटा मशीनमध्ये टाकल्या. तेव्हा त्या नोटा एरर येऊ लागल्या. तीन ते चार वेळेस त्या नोटा मशीनमध्ये टाकल्यास एरर येत होते. हा प्रकार तक्रारदार याना संशयास्पद वाटला.































































