
जेट एअरवेजच्या विमानाने तब्बल तीन वर्षांनंतर गुरुवारी पुन्हा उड्डाण केले. आर्थिक संकटात सापडल्यामुळे जेट एअरवेजने एप्रिल 2019 मध्ये आपली सेवा बंद केली होती. अखेर गुरुवारी एअरलाईन्सच्या 29 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून जेट एअरवेजचे विमान पुन्हा हवेत झेपावले.
एअरलाईन्सच्या एका विमानाने हैदराबादमध्ये टेस्टिंग उड्डाण केले. त्यानंतर दिल्लीसाठी एका विमानाचे पोझिशनिंग उड्डाण करण्यात आले. जेट एअरवेजने गुरुवारी उड्डाणाचा व्हिडीओ ट्विट करीत आपली सेवा तीन वर्षांनंतर पुन्हा सुरू झाल्याची खूशखबर दिली. जे लोक या दिवसाची वाट पाहत आहेत, जे लोक काम करीत आहेत आणि प्रार्थना करीत आहेत त्या सर्वांसाठी हा भावनिक दिवस आहे, असे ट्विट जेट एअरवेजने केले.
























































